रत्नागिरीकरांनो, पाणी जपून वापरा! शीळ धरणातील तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद

रत्नागिरी, १५ ऑक्टोबर:

​रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळधरण येथील वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहे. यामुळे, उद्या, गुरुवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

​रत्नागिरी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. शहराचा मुख्य पाणी स्त्रोत असलेल्या शीळ धरणावरील पाणी उपसा आणि वितरण प्रक्रिया पूर्णपणे विजेच्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. मात्र, आज सायंकाळी येथील वीज पुरवठ्यात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पाणी उपसा करणे शक्य होत नाहीये. परिणामी, शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

​या पार्श्वभूमीवर, नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, “आपल्या घरी उपलब्ध असलेला पाण्याचा साठा अत्यंत जपून आणि काटकसरीने वापरावा.” उद्या दिवसभर पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

​वीज पुरवठ्यातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, पाणीपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.