संगमेश्वर ः संगमेश्वर तालुक्यातील मुचरी, वाशी, कुळे, फणसवळे, बोरसूत पंचक्रोशी ग्रामस्थांनी रस्तादुरुस्ती होत नसल्याने आज (ता. १६) बुरंबी येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाला देण्यात आले.
मुचरी-घोटळवाडी ते वाशी देवशेत रस्ता हा नादुरुस्त झालेला असून, ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्तादुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयांकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. तसेच लोकप्रतिनिधींनाही स्थानिक ग्रामस्थांनी निवेदनं दिली होती; परंतु अद्यापही रस्तादुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याने ग्रामस्थ संतापले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. संगमेश्वर तालुक्याच्या आमसभेत वाशी सरपंच तन्वी गानू यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. रस्तादुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी मत मांडले होते. तसेच रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले, तरीही सोनवडे फाटा ते वाशीतर्फे संगमेश्वर शेरेवाडी ते देवशेत, किंजळे पुनर्वसन ते कुळे पुलापर्यंत रस्ता तत्काळ दुरुस्त केला नाही. तेर्ये, मुचरी, वाशी, किंजळे इजिमा ६९ या रस्त्यासाठी आवश्यक २० फूट जागा उपलब्ध असून, हा रस्ता नव्याने मंजूर करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी उद्या बुरंबी येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा ठाम निर्धार त्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन बांधकाम विभागाला दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रस्त्यासाठी ५० लाख मंजूर
देवशेत-वाशी रस्त्याबाबत आमसभेत मुद्दा उपस्थित झाल्यावर आमदार शेखर निकम यांनी या रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला असून, पाऊस गेल्यावर लगेच या कामाला सुरुवात होईल, असे सांगितले होते. मुख्यमंत्री सडक योजनेतून आणखी निधी मिळवून देण्याचे निकम यांनी जाहीर केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 16-10-2025














