डॉ. कलाम जयंतीनिमित्त वाटूळमध्ये सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन; राजापूर पोलिसांचा विद्यार्थ्यांशी संवाद

वाटूळ, ता. १५ : भारतरत्न, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून वाटूळ येथील रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये सायबर क्राईमबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राजापूर पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपलक्ष्मी पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे आणि पोलीस उपनिरीक्षक मोबिन शेख यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपलक्ष्मी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी इन्स्टिट्यूटमध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेत अजिंक्य मेस्त्री (प्रथम), मानसी गाढे (द्वितीय) आणि देवेश लांबोरे (तृतीय) यांनी यश मिळवले. तर क्राफ्ट स्पर्धेत कीर्ती सुतार आणि तृप्ती नवळू यांच्या ग्रुपने प्रथम, सकिना नाईक आणि तन्वी सावंत यांच्या ग्रुपने द्वितीय, तर सायली वाजे हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या सत्कार समारंभानंतर साहाय्यक पोलीस निरीक्षक दीपलक्ष्मी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी वाढत्या मोबाईल वापराचे दुष्परिणाम, सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी आणि त्यामुळे होणारे मानसिक व शारीरिक परिणाम यावर सविस्तर माहिती दिली.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी सायबर गुन्हेगारीवर विशेष मार्गदर्शन केले. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार, अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचे धोके, फेक कॉल्स, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग आणि आर्थिक फसवणूक कशी टाळावी याबाबत त्यांनी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी रॅलीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अण्णा पवार, वाटूळ ग्रामपंचायत सदस्य प्रशांत (दादा) चव्हाण, विद्या विकास मंडळाचे सेक्रेटरी विजय चव्हाण, आदर्श विद्यामंदिरचे शिक्षक वर्ग आणि पोलीस उपनिरीक्षक मोबिन शेख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रॅलीस पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी अंजली पवार यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आणि त्यांच्यात जनजागृती होण्यास मदत झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:32 16-10-2025