चिपळूण : विधानसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हिडिओद्वारे प्रशिक्षणाची सुविधा निवडणूक विभागाने केली आहे. पाच अधिकाऱ्यांचे १२ व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक चार व्हिडिओ चिपळूणचे प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे यांचे आहेत. निवडणूक प्रक्रियामध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाचा वापर होत असल्याने विधानसभा स्तरावर प्रशिक्षणार्थी यांची नियुक्ती करून सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. सार्वत्रिक निवडणूक २०२४च्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार निवडणूकविषयक गठित विविध समित्यांच्या प्रमुखांनी निवडणूकविषयक काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येते.
या प्रशिक्षणाला एखादा अधिकारी किंवा कर्मचारी गैरहजर राहिला तर त्याला व्हिडिओद्वारे निवडणूक कामकाजाची माहिती मिळावी यासाठी मागील तीन महिन्यांपासून निवडणूक विभाग या विषयावर काम करत होता. त्यासाठी पाच अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनीही वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ तयार करून आयोगाला सादर केले. निवडणूक आयोगाने एकूण १२ व्हिडिओ निवडून ते राज्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले आहेत.
क्षेत्रीय अधिकारी, भरारीपथक, स्थिर निगराणी पथक, व्हिडिओ व्हिव्हिंग टीम, सहायक खर्च निरीक्षक, दिव्यांग मतदारांकरिता जिल्हास्तरीय नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे, त्याद्वारे दिव्यांग मतदारांच्या निवडणूक संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी हे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार, मतदार व निवडणूक यंत्रणेच्या मदतीसाठी विविध सुविधा व अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहेत. सोबतच त्या त्या विषयाच्या अनुषंगाने विविध समित्या गठित केल्या आहेत. भयमुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणुकीदरम्यान या सुविधांचा लाभ घ्यावा. निवडणूक आयोगाने तयार केलेले व्हिडिओ निवडणूक कर्मचारी व अधिकाऱ्यांना कधीही बघता येणार आहेत. यातून निवडणुकीचे काम सुरळीत होणार आहे. आकाश लिगाडे, निवडणूक निर्णय अधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 23/Oct/2024














