Mandangad : धुत्रोली हनुमानवाडीत भरदिवसा वृद्ध महिलेच्या घरात घरफोडी

मंडणगड : तालुक्यातील धुत्रोली हनुमानवाडी येथील एका वृद्ध महिलेच्या घरात शिरणाऱ्या अज्ञात चोरट्याने सुमारे चार तोळ्यांचे दागिने व रोख रक्कम लांबविल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

सरस्वती सुगदरे (वय ६५) या नातवाला शाळेतून आणण्यासाठी घराला आतल्या बाजूने कडी लावून मागाच्या दाराची कडी बंद करून निघून गेलेल्या असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाची आतल्या बाजूने लावलेली कडी उचकटवून पुढच्या दाराने घरात प्रवेश केला व घराच्या कपाटाची कडी उघडून कपाटातील सोन्याच्या अंगठ्या, बांगड्या, कर्णफुले इत्यादी चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व कपाटातील रोकड असा मुद्देमाल चोरून घराच्या पुढच्या बाजूच्या मुख्य दरवाजाला कडी लावून पसार झाला.

आपले काम आटोपून घरी परत आलेल्या सरस्वती सुगदरे यांनी त्या घरातून जात असताना त्यांनी घराच्या दरवाजाची केलेली विशिष्ट परिस्थिती परत आल्यावर तशीच नसल्याचे लक्षात आल्याने, संशय आल्याने त्यांनी वाडीतील ग्रामस्थांना बोलावले व घरात चोरी झालेली असल्याचे लक्षात आले. गावाचे पोलिस पाटील यांच्या माध्यमातून पोलिस ठाणे मंडणगड यांना या चोरीबद्दल सूचीत केल्यानंतर पोलिस निरीक्षक नितीन गवारे आपल्या पोलिस पथकासह घटनास्थळी हजर झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

घरात आलेल्या मातीच्या अनुषंगाने पोलिस पथकाने चोरीचा छडा लावण्याच्या कामास सुरुवात केली असून यासंदर्भात पोलिस स्थानकात पंचनाम्याचे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यावर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. चोरी झालेल्या चार तोळे सोन्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 16/Oct/2025