पावस : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तयार भातशेती कापण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. परतीच्या पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी तातडीने भात कापणीला वेग आला होता. आतापर्यंत पावस परिसरात ५० टक्के भातशेती कापून पूर्ण झालेली आहे. आज अचानक आलेल्या पावसाने कापलेले भात भिजले आहे. पावस परिसरामध्ये २० मे पासून सुरुवात झालेल्या पावसाने ऑक्टोबरमध्ये पूर्णतः विश्रांती घेतली होती. त्यामुळे यावर्षी भात कापणीला अनुकूल वातावरण होते.
पावसाच्या विश्रांतीनंतर तयार झालेली भात रोपं कापण्यास सुरुवात झाली; परंतु हवामान विभागाकडून येत असलेल्या संदेशामुळे शेतकरी सकाळी कापणी उरकून घेत होता. त्यानंतर सायंकाळी सुकलेले भात उचलून झोडणी आटपत होता. आतापर्यंत ५० टक्के क्षेत्रांवरील भात कापणी पूर्ण झाली होती. उर्वरित भात कापणीला वेग आला आहे; परंतु त्यात पावसाचा व्यत्यय आला आहे.
पावस परिसरात सायंकाळी विजांच्या गडगडाटासह पावसाने सुरुवात केली. सुमारे अर्धा ते पाऊण तास दमदार पाऊस पडला. त्यामुळे आज सकाळी कापलेले भात पावसाने भिजून गेले. भातखाचरांमध्ये पाणी साठले असून, पाऊस सुरू राहिल्यास शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. सायंकाळी पाऊस पडल्यामुळे भिजलेली भात रोपं सुकणे अशक्य आहे. ते भात काळ पडण्याची शक्यता आहे.
यावर्षी पावसाने दरवर्षीच्या तुलनेत दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतीला पोषक वातावरण होते; मात्र पाऊस पडल्याने भात शेती धोक्यात आली आहे. गेले आठ दिवस भात कापणीच्या कामांना वेग आला होता. आता तो मंदावण्याची शक्यता आहे-नीलेश ठीक, शेतकरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 16/Oct/2025














