चिपळूण : बांबू लागवडीमुळे नदी किनारपट्टीचे संरक्षण होत असून, मातीची धूप कमी होते. तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते. पावसाळ्यात वाशिष्ठी आणि वैतरणाच्या पुराच्या पाण्यापासून वाचायचे असेल तर वाशिष्ठी नदीकिनारी प्रत्येक ठिकाणी बांबूची लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी केले आहे.
चिपळूण तालुका हा खाडीकिनारी वसलेला आहे. येथे नद्या, डोंगरदऱ्याही आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरडी कोसळणे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तसेच जीविताचे नुकसान होते. तालुक्यातील अनेक ठिकाणी नद्यांचे पात्र बदलत असून, नदीकिनारी असलेली शेती वाया जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील भागात वादळांपासून निर्माण होणारा धोका कमी करण्यासाठी बांबूची मदत होणार आहे. त्याचबरोबर बुरूड समाजाला निरनिराळ्या वस्तू बनवण्यासाठी बांबू उपयुक्त ठरत आहेत.
गेल्या काही वर्षांत तालुक्यातील किनारी भागासह डोंगराळ भागत असणाऱ्या गावांमध्ये सातत्याने पुराचा धोका वाढला आहे. पोफळी, कुंभार्टी, पेढांबे, अहरे, तिवरे, वालीटी खडपोली या भागातील स्थानिक नद्यांच्या पाण्यामुळे पावसाळ्यातील शेती धोक्यात आली आहे. वाशिष्ठी वैतरणासह ग्रामीण भागातील इतर नद्यांमुळे येणाऱ्या पुराच्या धोक्यामुळे दरवर्षी हजारो नागरिकांना शेती सोडावी लागत आहे. प्रत्येक गावातून नदीकिनारी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्याची मागणी होत आहे, सरकारला हे परवडणारे नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या बांधावर बांबूची लागवड केली तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. त्यासाठी शासनाने बांबू लागवडीला प्राधान्य दिला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
बांबू लागवडीमुळे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धनाला मदत होऊ शकेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड केल्यास त्यांना जोडउत्पन्न मिळू शकेल. बुरूड समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने राहतो. त्यांना परराज्यातून बांबू आणावा लागतो. या लागवडीमुळे बांबू जिल्ह्यात उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला शक्य असेल त्या ठिकाणी बांबू लागवड करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार कामही सुरू झाले आहे. लवकरच याचे सकारात्मक परिणामही पाहायला मिळतील- शत्रुघ्न म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण
बांबू लागवडीचे फायदे
बांबूची लागवड जमिनीतील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे दुष्काळ आणि पुरासारख्या समस्या कमी होतात.
बांबू वन्यजीवांसाठी अधिवास आणि अन्नस्रोत निर्माण करते, त्यामुळे त्यांची संख्या वाढते.
बांबूचा वापर बांधकाम, फर्निचर आणि विविध वस्तू बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळतो.
बांबू नैसर्गिक आणि टिकाऊ आहे, त्यामुळे तो पर्यावरणास अनुकूल आहे.
बांबूचा वापर प्लास्टिक आणि इतर हानिकारक सामग्रीच्या जागी करता येऊ शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 17/Oct/2025














