दापोली : दापोली-मंडणगड महामार्गावर खोंडा परिसरात गुरुवारी (१६ ऑक्टोबर) रात्री सुमारे ९ ते ९:१५ वाजण्याच्या दरम्यान एक भीषण अपघात घडला. जाहिद कॉम्प्लेक्ससमोर असलेल्या पुलाजवळ दापोलीकडून मंडणगडच्या दिशेने वेगाने येणारी कार अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या आंब्याच्या झाडाला जोरदार धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. तर अपघातानंतर कार पुन्हा वळून दापोलीच्या दिशेने तोंड करून उभी राहिली असल्याचे पहावयास मिळाले. अपघाताच्या आवाजाने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले आणि चालकाला बाहेर काढून तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालय इथे हलवले.
अपघातातील कारचालक अश्रफ मेमन (राहणार हर्णे) हा या दुर्घटनेत किरकोळ जखमी झाला असून त्याच्या पायाला तीन टाके पडले आहेत. त्याला दापोली उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर काही काळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 17/Oct/2025














