Chiplun : लोकमान्य वाचनालयाचे वाङ्मय पुरस्कार प्रदान

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने दिले जाणारे वाङ्मय पुरस्कार नुकतेच वाचनालयाच्या ‘बाळशास्त्री जांभेकर’ सभागृहात प्रसिद्ध गझलकार प्रा. कैलास गांधी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुरस्कार विजेते श्रीकांत पाटील, अविनाश बापट, प्रा. सुहास बारटक्के, विजय जोशी, धनाजी घोरपडे आणि वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात कवीवर्य द्वारकानाथ शेंडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर कार्याध्यक्ष इंगवले यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे प्रा. गांधी यांचा परिचय वाचनालयाचे संचालक अनिल धोंड्ये यांनी करून दिला. कैलास गांधी यांना कार्याध्यक्ष इंगवले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यानंतर लेखक धनाजी घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’ या कवितासंग्रहाची संचालक राष्ट्रपाल सावंत यांनी माहिती सांगितली. धनाजी घोरपडे यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे ‘मृदंगी ‘पुरस्काराने सन्मानित केले.

दुसरा पुरस्कार द्वारकानाथ शेंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजय जोशी यांच्या ‘वृत्तबद्ध कविता ते गझल तंत्र आणि मंत्र’ या पुस्तकाला देण्यात आला. विजय जोशी यांना कविवर्य द्वारकानाथ शेंडे ‘समीक्षा’ पुरस्काराने सन्मानित केले. सुहास बारटक्के यांना ‘कवी माधव’ पुरस्काराने, अविनाश बापट यांना कवी आनंद पुरस्काराने, श्रीकांत पाटील यांना द्वारकानाथ शेंडे ‘मनबोली ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कैलास गांधी यांनी आपल्या मनोगतामध्ये शेरोशायरी ऐकवल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा दामले यांनी तर आभार विनायक ओक यांनी मानले. कार्यक्रमाला दिशा दाभोळकर, सुनील टेरवकर, कवी सुदेश मालवणकर, कवी सुनील कदम, संचालक, सभासद तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 17/Oct/2025