खेड : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने सन २०२५ साठीचा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, खेड येथील मराठी विषयाच्या नामांकित शिक्षिका अनघा तोडकरी यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पुणे येथे झालेल्या भव्य सोहळ्यात संघटनेच्या पुणे विभाग जिल्हा महिला रक्षक अध्यक्षा श्रीमती शर्वरी जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.
या कार्यक्रमाला रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, राष्ट्रीय उपाध्यक्ष भरत पाटील, पर्यटन विभाग कोकण अध्यक्ष बाळासाहेब नकाते, कार्याध्यक्ष संजय खटके, राज्य प्रसिद्धी प्रमुख गोविंद राठोड तसेच राज्यभरातील अनेक मान्यवर, शिक्षकवर्ग आणि पुरस्कार विजेते उपस्थित होते.
अनघा तोडकरी या केवळ एक कुशल शिक्षिका नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असतात. विद्यार्थ्यांच्या कला आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून त्या स्वतः नाट्यलेखन आणि एकांकिका लेखन करून विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करवितात. मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व आणि अध्यापनातील नवकल्पना यामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक रुचकर व प्रेरणादायी वाटतो.
विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आत्मविश्वास देणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रयत्न करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी झटणे हा त्यांच्या अध्यापनाचा मुख्य गाभा आहे. अनघा तोडकरी यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजेशभाई बुटाला, शिक्षकवर्ग, संचालक मंडळ तसेच विद्यार्थीवगनि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. या यशाबद्दल परिसरात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असून त्यांचे कौतुक होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 17/Oct/2025














