खेड : दीपावली उत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदा विश्वविक्रमी दुर्गोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले असून, त्यासाठी राज्यभरातील शाळा, संस्था आणि नागरिकांना शिवकालीन गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत खेड तालुक्यातील बिजघर क्रमांक एक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन किल्ल्याची देखणी प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख महेंद्र जाधव यांच्या प्रेरणेने व शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. समाजशास्त्र विषयाचे शिक्षक संदीप घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मेहनतीने किल्ला उभारला. या कार्यात शिक्षक शैलेश पराडकर आणि विजय सकपाळ यांनीही मनापासून सहकार्य केले. शिवकालीन किल्ल्याची ही प्रतिकृती पूर्णतः विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून तयार करण्यात आली असून, यात किल्ल्याचे प्रवेशद्वार, बुरुज, तोफ, तटबंदी आणि दरवाजा यांचे बारकावे अचूकपणे दर्शविण्यात आले आहेत. किल्ल्याच्या सजावटीसाठी माती, कागद, थर्माकोल, रंगीत कागद आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान जंगम यांनी या उपक्रमासाठी आवश्यक साहित्य आणि सहकार्य पुरविले. विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही किल्ल्याची प्रतिकृती पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शाळेत गर्दी केली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आदर, शिवकालीन वारशाची जाणीव आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले असून, शासनाच्या “दुर्गोत्सव” उपक्रमाला गावस्तरावरून सुंदर प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 17/Oct/2025












