Ratnagiri : केंद्रप्रमुख पदासाठी भरती परीक्षेद्वारे होणार

चिपळूण : बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या केंद्रप्रमुख पदासाठीच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेला मुहूर्त लाभला असून ही परीक्षा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात १ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात केंद्रांतर्गत शाळा स्तरावर शैक्षणिक गुणवत्ता विकास व सनियंत्रणाचे काम करणारे क्षेत्रीय अधिकारी अर्थात केंद्रप्रमुख पदासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात केंद्रप्रमुखांची एकूण ४८६० पदे मंजूर असून त्यामधून ५० टक्के पदे शिक्षक संवर्गातून सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नतीने तर ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारा प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांमधून भरली जाणार आहेत. विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारा भरण्यात येणारी पदे अनेकदा शिक्षकांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमुळे भरण्यात आली नव्हती. त्यामुळे ५० टक्के पदे रिक्त होती. आता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा द्वारा ही पदे भरली जाणार असल्याने प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना वरच्या पदावर जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

नवीन शिक्षक बहुतांशपणे टीईटी उत्तीर्ण असल्याने व सध्या ते विविध परीक्षांचा अभ्यास करीत असल्याने त्यांना या पदभरतीचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निर्णयानुसार एका जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकाला या परीक्षेसाठी अन्य जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करता येणार नाही. तसेच या परीक्षेसाठी दिव्यांगाना आरक्षण ठेवण्यात आले आहे. लवकरच ही भरती प्रक्रिया होणार असल्याने परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. पदोन्नतीने जागा न भरल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 18/Oct/2025