Ratnagiri : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट, गण आरक्षणावर सात हरकती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी हातखंबा गटासाठी २ हरकती आणि नाणीज पंचायत समितीच्या गणासाठी एक हरकत प्राप्त झाली आहे. १९९६ च्या रोटेशननुसार आरक्षणात बदल व्हावे, अशा हरकती घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम १२ पोटकलम (१) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम ५८ (१) (अ) अन्वये पंचायत समित्यांमधील गणाची प्रभागरचनेनुसार निवडणूक जाहीर होणार आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ही निवडणूक होईल. या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणासंदर्भात आजपर्यंत हरकती घेण्याची मुदत होती.

शेवटच्या दिवशी हातखंबा जिल्हा परिषद गटासाठी जाहीर झालेल्या आरक्षणासंदर्भात दोन हरकती घेण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये ज्या आरक्षणावर निवडणुका झाल्या तेच अनुसूचित जातीचे आरक्षण येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी जाहीर झाल्याने सर्वसाधारण आणि इतर मागासवर्ग ग्रामस्थांवर अन्याय होत असल्याबाबत आक्षेप घेण्यात आला आहे. नाणीज पंचायत समिती गणासाठी एक हरकत प्राप्त झाली आहे. या ठिकाणी जाहीर झालेले नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण या आधीच्या निवडणुकीतही जाहीर झाले होते. संगमेश्वर-दाभोळ गणासाठीही २ हरकती आल्या आहेत.

याबाबत हरकत घेण्यात आली असल्याचे सांगितले. या आरक्षणासाठी १९९६ च्या रोटेशनप्रमाणे बदल व्हावेत, अशी मागणी या हरकतींच्या माध्यमातून करण्यात आली आहे. २७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी या हरकतींवर सूचना आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना सादर करतील. ते ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकतींचा विचार करून आरक्षण अंतिम करतील.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 18/Oct/2025