संगमेश्वर : माखजन परिसरात शेतीला परतीच्या पावसाचा फटका

माखजन : मेघनगर्जनांसह कोसळणाऱ्या परतीच्या पावसाचा फटका संगमेश्वर तालुक्यातील माखजन, आरवली, करजुवे परिसरातील गावांना बसला आहे. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची मेहनत व पैसा मोठ्या प्रमाणात फुकट गेला आहे.

शेतात भिजलेली शेती वाळवणे व त्यानंतर झोडणे यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाया जात आहे. पावसाच्या तडाख्यात उभी शेती जमीनदोस्त झाली आहे. गडनदीच्या पुराचा फटका बसल्यावर त्यातून उभी राहिलेली शेती परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडली आहे. आडवी झालेली शेती पाण्यात राहिल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य झालेली शेती पावसामुळे कापू न शकल्याने शेतकरी वर्ग मात्र हताश झाला आहे. अनेक ठिकाणी गतवर्षी दसऱ्याच्या आसपास भात कापणी पूर्ण झाली होती; परंतु यावर्षी दिवाळीची चाहूल लागली तरी भातकापणी रखडली आहे. भातकापणी पूर्ण होताच पावटा, कडवा, कुळीथ, चवळी आदींची पेरणी तत्काळ केली जाते; परंतु सगळ्याच गोष्टी रखडल्या आहेत. परतीचा पाऊस थांबण्याची वाट सर्वत्र पाहिली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 23/Oct/2024