चिपळूण : घोणसरे येथे ट्रक-दुचाकीमध्ये भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोणसरे- चिवेली फाटा येथे काल, मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला.

अपघातादरम्यान आयशर ट्रकला अचानक लागून ट्रक जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले.

सौरभ अनिल घोरपडे (२६, मार्कंडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच प्रफुल कदम (चिवेली) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेरवण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी आयशर ट्रक चालक रमाकांत जाधव ( ५९, शृंगारतळी, गुहागर) याला ताब्यात घेतले आहे. मृत सौरभ घोरपडे हा तरुण चिपळुणातील एका फायनान्स कंपनी वसुलीचे काम करत होता.

गुहागरकडून-चिपळूणकडे येणाऱ्या भंगार वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकची दुचाकीस्वाराला डाव्या बाजूस जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. येथे मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या नागरिकांनी या अपघाताबाबत संताप व्यक्त केला.

अपघातानंतर अचानक या ट्रकला आग लागली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात पुट्टा होता. त्यामुळे काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. यामध्ये ट्रक जळून खाक झाला. अपघातामुळे चिपळूण-गुहागर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याची नोंद करण्याचे काम उशिरा पर्यंत सुरू होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 23-10-2024