Mandangad : अतिवृष्टीने मंडणगडला आर्थिक फटका

मंडणगड : अतिवृष्टीमुळे मंडणगड तालुक्यातील अनेक नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. तालुका प्रशासनाने सादर केलेल्या पंचनाम्यानुसार एकूण १३.९२ लाखांचे नुकसान नोंदवले गेले. अतिवृष्टीमुळे घरे, गोठे, जनावरे आणि शेती नुकसानापोटी एकूण ५.३७ लाखांचे अनुदाने तालुक्यात वाटप करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

यावर्षी १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान पूर्णतः उद्ध्वस्त झालेल्या एक घराचे १.५० लाख नुकसान झाले होते. त्यांना १.२० लाख नुकसानभरपाई देण्यात आली. अंशतः घरांच्या नुकसानीमध्ये ३५ पैकी १९ प्रकरणांत एकूण नुकसान ८.७९ लाख नुकसान झाले. त्यापैकी मदत १.२१ लाख मदत वितरित करण्यात आली. अंशतः गोठ्यांचे नुकसान झालेल्या ९ पैकी ३ प्रकरणांत ३.५४ लाख नुकसान झाले. त्यात मदत ९ हजार नुकसानभरपाई दिली आहे. पशुधन हानीमध्ये २ प्रकरणे असून, ८० हजार ५०० नुकसानीपैकी ६९ हजार ५०० मदत केली. मृत व्यक्ती अथवा जखमी व्यक्ती, असे कोणतेही प्रकरण नोंदले गेले नाही. एकूण नुकसानाची रक्कम १३ लाख ९२ हजार २५१ असून, त्यापैकी ३ लाख १९ हजार ५०० इतकी मदत आतापर्यंत वितरित झाली आहे. तसेच १ लाख ९ हजार ९०० इतकी निधीची मागणी शिल्लक आहे.

दरवर्षी तालुक्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान होते. प्रशासनाच्या वतीने त्याचे रीतसर पंचनामे होतात; मात्र त्याबद्दल मिळणारी नुकसानभरपाई तुटपुंजी मिळते. शासन, प्रशासनाने याचा विचार करावा. – समीर पारधी, शेतकरी.

शेतकऱ्यांना २ लाख १७ हजारांचे अनुदान
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. नुकसान झालेल्या १११ शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. २५.५९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले असून, सर्व शेतकऱ्यांचे डीबीटी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण झाले आहे. शासनाकडून एकूण २ लाख १७हजारांचे अनुदान खात्यावर जमा केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 18/Oct/2025