देवगड : तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात यंदाही बुधवारी (ता. २२) दीपावली पाडवा सणाच्या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याचदरम्यान मंदिर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यंदा सुमारे २१ हजार पणत्यांची आरास करण्याचा मानस असल्याचे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली यांनी सांगितले.
भाविकांकडून प्रतिदीप १० रुपयांप्रमाणे वर्षभरामध्ये संकलन होणाऱ्या निधीतून हा दीपोत्सव रंगणार आहे. उत्सवात सर्व भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहनही श्री. तेली यांनी केले. खजिनदार उदय पेडणेकर, सदस्य संजय वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम, सरपंच महेश ताह्मणकर आदी उपस्थित होते.
श्री. तेली म्हणाले, ‘मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाडव्याला दीपोत्सव होणार आहे. सुमारे २१ हजार पणत्या प्रज्वलित करण्याचा मानस आहे. याचदरम्यान श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट प्रस्तुत श्रीपाद शांताराम जांबोडकर निर्मित ‘स्वर श्रीपाद’ या सुगम संगीत मैफलीचे आयोजन केले आहे.’
या कार्यक्रमात पंडित जयकृष्ण भाटिकर, सुभाष प्रभूदेसाई (स्वरमंच मडगाव आणि शंकर महादेवन अकादमीचे शिष्य), श्रीपाद जांबोडकर (मडगाव-गोवा) तसेच गायिका करिष्मा शेटकर (गोवा), गायक साईश नाईक (गोवा) यांचा सहभाग असेल. त्यांना वाद्यवृंद साथ कीबोर्ड, सिन्थेसाईझर-केतन चारी (गोवा), तबला-राज मडगावकर (गोवा), संवादिनी प्रतीक धामस्कर (गोवा), पखवाज, टाळ-प्रीतम धामस्कर, तर निवेदन अलिशा नाईक करणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता मुख्य मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ७.१५ वाजता मंदिर व परिसरामध्ये दीपप्रज्वलन, ६ ते ८ या वेळेत संगीत मैफल, रात्री ८.३० ते ९ पर्यंत सन्मान सोहळा, ९ ते ९.३० दरम्यान पालखी प्रदक्षिणा सोहळा असे कार्यक्रम होतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:01 AM 20-Oct-25














