Dapoli : बुरोंडी घरफोडीत तीन लाख ९६ हजारांचा ऐवज लंपास

दापोली : तालुक्यातील बुरोंडी, समर्थनगर येथील बंद घर फोडून चोरट्यांनी तीन लाख ९६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. खेड, मंडणगड पाठोपाठ दापोली तालुक्यात झालेल्या चोरीने खळबळ उडाली आहे.

दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलम अविनाश शिरगावकर (वय ४५, व्यवसाय-मच्छीमारी, रा. बुरोंडी समर्थनगर, दापोली) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या काळात हा चोरीचा प्रकार घडला. शिरगावकर यांचे घर बंद असताना चोरट्यांनी घराच्या हॉलमधील स्लायडिंगची खिडकी बाहेरून सरकवून घरात प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटाचे लॉकर हत्याराने चोरट्यांनी तोडले.

लॉकरमध्ये ठेवलेले तक्रारदारांच्या मामे-सासूकडील मौल्यवान दागिने रक्कम आणि रोख चोरट्यांनी नेली. घरात तीन लाख ९६ हजार रुपयांचे दागिने होते. त्यात १ लाख २० हजार रुपये किमतीची बोरमाळ, ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, ५० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स, ३० हजार रुपये किमतीचे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स आणि १० हजार रुपये किमतीची १.५ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ यांचा समावेश आहे. दागिन्यांसह चोरट्यांनी घरातील विविध ठिकाणी ठेवलेली रोख रक्कमही चोरून नेली. त्यात डायरी, पर्स आणि प्लास्टिक बरणीत ठेवलेल्या २००, १०० आणि ५० रुपयांच्या नोटा अशी एकूण एक लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरीस गेली आहे.

अज्ञात चोरट्यांनी तक्रारदारांच्या घरात चोरी केल्यानंतर त्यांचे दीर नरेंद्र शिरगावकर यांच्याही घरात प्रवेश केला होता. मात्र, त्यात अपयश आले. या प्रकारानंतर तक्रारदार नीलम शिरगावकर यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घरफोडीचा पोलिस कसून तपास करत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे समर्थनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बुरोंडी येथील चोरी प्रकरणाचा तपास जोरदार सुरू आहे. आज एका चोरीचा उलगडा झाला आहे. लवकर या चोरीचादेखील उलगडा होईल. घरफोडीचा तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे- महेश तोरस्कर, पोलिस निरीक्षक, दापोली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 20-Oct-25