मंडणगड : एकेकाळी सर्व अंगांनी दुर्लक्षित असलेला मंडणगड तालुका आज खऱ्याअर्थान विकासाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. ज्या तालुक्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळगाव आहे तिथे उच्च शिक्षणाची व न्यायदानाची सोय नसावी हे खरोखरच दुर्भाग्यपूर्ण होते. आज केंद्र व राज्य सरकारने भरघोस निधी उपलब्ध करून येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाची भव्य इमारत उभी करून येथील सामान्य नागरिकांची न्यायदानाची उणीव दूर केली आहे. या न्यायालयामुळे कमी खर्चात व कमी वेळेत त्यांना न्याय मिळू शकणार आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या डी. एन. टी. आयोगाचे माजी अध्यक्ष व उच्चधिकार समितीचे सदस्य व सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी केले.
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीस दादा इदाते यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.दादा इदाते पुढे म्हणाले की, याठिकाणी विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य सरकार व मुंबई विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मॉडेल कॉलेज सुरू करून खऱ्याअर्थान डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारले आहे.
यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादा इदाते प्रतिष्ठानचे कार्यवाह सदानंद रसाळ, माजी तालुका मास्तर सदाशिव रसाळ, मुंडे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 20-Oct-25














