गणपतीपुळे : दिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे विविध ठिकाणांहून मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत मोठी खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान समिती तसेच गणपतीपुळे पोलिस यंत्रणेने केले आहे. दरम्यान, पर्यटकांची किनाऱ्यावरील गर्दी लक्षात घेता प्रशासन त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट मोडवर आहे.
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि गणपतीपुळे ग्रा. पं. च्या जीवरक्षक व पोलीस यंत्रणेला यश आले होते. समुद्रात बुडताना जीवदान मिळवून देण्याची घटना लक्षात घेता तसेच दिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे विविध ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत मोठी खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान समिती व गणपतीपुळे पोलिस यंत्रणेने केले आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर कुठलाही धोक उद्भवू नये, या उद्देशाने पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत सुरक्षितता बाळगून खबरदारी घेण्याचेआवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये, समुद्रातील भरती ओहोटीचा वेग, मोठ्या लाटा आणि प्रवाह या विषयीची माहिती स्थानिक व्यावसायिक आणि जीव रक्षकांकडून घ्यावी तसेच जीव रक्षक आणि वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे करावे, समुद्रकिनारी लावलेले लाल झेंडे आणि जीव रक्षकांचे इशारे याबाबत माहिती घ्यावी तसेच स्वतःची आणि कुटुंबियांची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ सुरक्षित मर्यादेतच समुद्रस्नानाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मोरया वॉटर स्पोर्टची तत्परता
वॉटर गणपतीपुळे समुद्रात एखादा पर्यटक बुडत असेल, तर अशा व्यक्तीस सुरक्षित पाण्याबाहेर काढण्यासाठी आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी किनाऱ्यावरील मोरया स्पोर्टच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष तत्परता दाखवली जाते. या कर्मचाऱ्यांमुळेच गेल्या काही वर्षांत गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यंदाच्या दिवाळी हंगामापासून वॉटर स्पोर्ट व्यावसायिक समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले असल्याकारणाने येथील समुद्राच्या खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 20-Oct-25














