खेड : खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागात बहिरवली, सवणस या गावातून सक्शन पंपाने मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन करण्यात येत आहे. या बेकायदेशीर पणे चाललेल्या उत्खननात शासनाचा महसुल बुडत आहे. चिपळूण येथील खाडीपट्टा भागातील गावांमधील काही सक्शन पंप असलेले ट्रोलर हे खेड तालुक्याच्या हद्दीत आणून हे उत्खनन सुरु आहे.
दिवसभर हे सक्शन पंप असलेले ट्रोलर चिपळूण भागात उभे करुन ठेवले जातात. मात्र, संध्याकाळी ते खेड तालुका हद्दीत आणून सक्शनने वाळू उपसा केला जातो. सोमवार ते शुक्रवार पर्यंत हा प्रकार चालतो, तर त्यानंतर शनिवारी आणि रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी दिवसा आणि रात्री वाळूचा उपसा करण्यात येत आहे.
ड्रेझर आणि हातपाटीच्या वाळू उत्खननास गेल्या काही वर्षात परवानगी देण्यात आली होती. परंतु यावर्षी या दोन्हीही परवानग्या महसूल विभागाने दिलेल्या नाहीत. त्याशिवाय सक्शन पंपाने वाळूचे उत्खनन करण्यास मुळात परवानगी नाही. परंतु, येथील वाळू व्यावसायिक यांनी खेड आणि चिपळूण तालुक्यात इकडून तिकडे तर तिकडून इकडे अशा ट्रोलर ला सक्शन बांधून आणून वाळूचा उपसा करण्यात येत आहे. या गंभीर प्रकाराने शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून या उत्खननाकडे खाडीपट्टा विभागातील मंडळ अधिकारी, गावकामगार तलाठी हे दुर्लक्ष करत आहेत. की ते जाणून बुजून दुर्लक्ष करुन राहिलेले आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
शासनाच्या गौण खनिज विभागाचे नियम धाब्यावर बसवून गेल्या दीड ते दोन वर्षांपासून हे सक्शन ने वाळूचे उत्खनन सुरु आहे. हे उत्खनन रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी एक निवेदन तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी या महसूल विभागाचे प्रमुखांना दिलेले आहे. मात्र या निवेदनाची दाखल कुणीही घेत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिक अब्दुल जाफर सुर्वे यांनी बोलताना दिली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वाळूचे सक्शन ने होणारे उत्खनन सुरुच राहणार की, महसूल विभाग ते बंद करणार, याकडे खाडीपट्टा विभागाचे लक्ष लागून राहिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 23/Oct/2024














