दापोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागातील दापोली आगारात दिवाळीच्या मुहूर्तावर १० अत्याधुनिक इलेक्ट्रिक ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक गाड्यांचे शनिवारी (ता.१८) स्वागत करण्यात आले. लवकरच आणखी ३० बसेस येणार असून एकूण ४० ई-बसच्या माध्यमातून दापोली आगार प्रवाशांना आधुनिक, पर्यावरणपूरक आणि सोईस्कर प्रवासाची नवी अनुभूती देणार आहे.
नागपूर येथून १५ ऑक्टोबरला दापोलीकडे रवाना झालेल्या या बस आज सकाळी दापोलीत दाखल झाल्या. विशेष म्हणजे, या दीर्घ प्रवासाची जबाबदारी दापोली आगारातीलच १० स्थानिक चालकांनी यशस्वीपणे पार पाडली. या प्रवासात अँथनी कार्डोजा, रूपेश खताते, पृथ्वेश केळकर, सूरज जाधव, सुयश बुटाला, श्रीप्रसाद दरीपकर, समीर तांबे, अक्षय पवार, मनोहर कांबळे आणि विनायक अघारकर या सर्व चालकांना डी.एम. सज्जन जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या ‘ई-शिवाई’ बसेस दापोली-पनवेल, दापोली-पुणे, दापोली-बोरिवली आणि दापोली-रत्नागिरी या मार्गांवर धावणार असून, लवकरच नियमित फेऱ्या सुरू होणार आहेत.
प्रवाशांच्यात उत्सुकता
दापोली आगारात दिवाळीच्या मुहूर्तावर १० अत्याधुनिक इलेक्ट्रिक ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या. लवकरच आणखी ३० बसेस आगाराला उपलब्ध होणार आहेत. यामुळे दिवाळी सुटीत गावी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. प्रदूषणमुक्त आणि आरामदायी अशा या बसमधून प्रवास करण्याची उत्सुकता प्रवाशांना लागून राहिली आहे.
या इलेक्ट्रीक बसेसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी व प्रदूषणमुक्त प्रवासाचा लाभ होईल. विभागातील परिवहन सेवेत नवा अध्याय सुरू झाला आहे-राजेंद्र उबाळे, आगार व्यवस्थापक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 20-Oct-25














