Dapoli : ‘पहिला दिवा राज्याच्या चरणी’ विशेष मोहिमअंतर्गत हर्णेतील गोवा किल्लावर रोषणाई

दापोली : हर्णे येथील ऐतिहासिक गोवा किल्ला (भुईकोट किल्ला) परिसरात जय भवानी प्रतिष्ठान, हर्णै यांच्या माध्यमातून ‘पहिला दिवा राज्याच्या चरणी’ या विशेष मोहिमेअंतर्गत दीप रोषणाईचा भव्य कार्यक्रम पार पडला. गडावरील मारुती मंदिर व किल्ल्याच्या उत्तरेकडील महाद्वार येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला.

हर्णे समुद्रकिनाऱ्यालगत वसलेला गोवा किल्ला हा सुमारे १६ व्या शतकात पोर्तुगीज सत्ताकाळात बांधला गेला असल्याचे ऐतिहासिक पुरावे सांगतात. पुढे मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किनारी संरक्षणासाठी महत्त्वाचे ठाणे म्हणून विकसित केला. गोवा किल्ला हा भुईकोट आणि सुवर्णदुर्ग किल्ला हा जलदुर्ग हे दोन्हीही किल्ले अगदी समोरासमोर आहेत. सागरी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रणनीतीपूर्वक हा किल्ला उभारला गेला होता. आजही हा किल्ला कोकणातील ऐतिहासिक वारशाचे प्रतीक म्हणून उभा आहे.

दीपोत्सवाच्या या उपक्रमात जय भवानी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा दीपक खेडेकर, तसेच सदस्य रोहन पिंपळे, प्रशांत मुसलोणकर, गणेश खेडेकर, संतोष कोकाटे आणि विजय मुरुडकर यांचा सक्रिय सहभाग होता. दीप प्रज्वलनानंतर फटाके फोडून आणि मिठाई वाटून सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला. गावातील अनेक स्थानिक तरुणांनीही मोठ्या उत्साहाने गडावर हजेरी लावत दिव्यांच्या प्रकाशात आनंद व्यक्त केली.

या उपक्रमाचा उद्देश दीपावली सण साजरा करताना ऐतिहासिक वारशाचे जतन व जागरूकता निर्माण करणे हा होता. उत्तरेकडील प्रवेशद्वार दिव्यांच्या प्रकाशात उजळून गेले होते. या उपक्रमामुळे गडाला दीपावलीच्या पारंपरिक सोहळ्यातून ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभिमानाची नवी झळाळी प्राप्त झाली आहे. दीपक खेडेकर, जय भवानी प्रतिष्ठान

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:10 PM 20-Oct-25