RTO : ३,४५२ वाहनांवर आरटीओच्या वायुवेग पथकाची कारवाई

रत्नागिरी : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत ३,४५२ दोषी वाहनांवर कारवाई करत १ कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच थकीत करापोटी ७. २५ लाखांचा दंड वसूल केला आहे.

महामार्गावरील वाहनांच्या तपासणीदरम्यान मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून दंड वसूल केला जातो. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच कर थकविणाऱ्या एकूण ३,४५२ दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

या कारवाईतून १ कोटी ६३ लाख १० हजार रुपयांचा दंड आणि थकीत करापोटी ७.२५ लाख रुपये वसूल केले आहेत. सर्वाधिक दंडवसुली मालवाहू ट्रक, टिप्पर, ट्रेलर या वाहनांकडून केली आहे. या १४४ ओव्हरलोड वाहनांकडून ५५ लाख ८२ हजारांची दंडवसूली करण्यात आली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्या १२१ प्रवासी बस, रिक्षा यांच्याकडून १५.८० लाख रुपयांची दंडवसूली करण्यात आली आहे. ३१ दोषी स्कूलबस वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने चालकांसाठी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७२६ वाहनांवरही कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे.

तपासणी मोहीम कायम
अपघातांना आळा घालणे तसेच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीकोनातून ही तपासणी मोहिम यापुढेही सुरू राहणार आहे. सर्व वाहनधारकांनी तसेच चालकांनी वाहन चालवताना वाहतु‌कीच्या नियमांचे पालन करावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी सांगितले.

त्यांची अतिवेगाची नशा उतरली
आरटीओच्या या कारवाईत १,०१६ प्रकरणांमध्ये अतिवेगाने जाणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अतिवेगाची नशा तरुण पिढीमध्ये वाढत आहे. यामध्ये अपघातही होत आहेत. याला आळा घालण्यासाठी आरटीओने पाऊल उचलले आहे. सध्या महामार्ग हळूहळू सुस्थितीत येत असल्याने गाड्यांचा वेग वाढू लागला आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:23 PM 20-Oct-25