Vilas Patne | …..तर अंधाराबरोबर दिव्यालाही बरे वाटते ! : अॅड. विलास पाटणे

रत्नागिरी : हजार दिव्यांमध्ये एक दिवा लावण्यापेक्षा तो अंधारात लावावा, ज्यायोगे अंधाराबरोबर दिव्यालाही बरे वाटते, असे प्रतिपादन रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.

दीपावलीनिमित्त आयोजित बार असोसिएशनच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अॅड. भाऊ शेट्ये, अॅड. विजय साखळकर, अॅड. प्रफुल्ल साळवी, अॅड. पुष्पराज शेट्ये, अॅड. श्रीरंग भावे, अॅड. रत्नदिप चाचले, अॅड. शाल्मली अंबुलकर, अॅड. अवधूत कळंबटे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, इन्फोसिसच्या चेअरमन सुधा मुर्ती देशभर लायब्ररी बांधण्याकरिता फिरत होत्या. अशाच प्रकारे ओरिसा प्रांतात फिरताना एक दिवस प्रचंड वादळ व मुसळधार पाऊस पडत होता. त्या एका झोपडीवजा घरात गेल्या. त्या झोपडीत एक कर्ता पुरुष, त्यांची पत्नी व तान्ह बाळ अशी माणस राहत होती. घरी आलेल्या पाहुण्याना अतिथी धर्म म्हणून त्या कर्त्या पुरुषाने मूर्ति यांना विचारले तुम्ही काय घेणार? त्यावर सुधा मूर्ती म्हणाल्या, मला थोडे दूध चालेल. यावर पाहुण्यांना दूध देण्यासाठी सांगण्याकरीता तो माणूस पत्नीजवळ गेला. पण नेमके घरात एकच छोटा पेला शेळीच दूध शिल्लक होतं. पत्नी म्हणाली, घरात थोडस शिल्लक असलेल्या दूधाची बाळाला गरज आहे. त्यावर तो माणूस म्हणाला तू दोन चमचे दूध व चार चमचे पाणी टाकून ते आपण पाहुण्यांना देऊन अतिथी धर्म पाळूया. मूर्तीना थोडीफार ओरिसा भाषा येत असल्याने त्यांना पतीपत्नी मधील संवाद कळला. संवाद ऐकून त्या अस्वस्थ झाल्या. तान्ह्या मुलाचं दूध आपण तोडतो आहोत, हे त्यांच्या मनाला फार लागलं.

मूर्ती त्या माणसाला म्हणाल्या “माफ करा मी विसरलेच की आज माझा उपवास आहे. आज मी काहीच घेणार नाही. मित्रांनो ५ हजार ३२४ कोटी एवढी संपत्ती असलेल्या इन्फोसिसच्या चेअरमन सुधा मुर्ती यांनी त्या दिवसापासून दुधाचा त्याग केला. एक व्यक्ती दुसऱ्याच्या दुःखाने किती हेलावते आणि सहवेदना आयुष्यभर जपते याच सामाजिक भान आपण या शुभ दीपावलीत जपूया, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:38 PM 20-Oct-25