Sangameshwar : संगमरत्नतर्फे प्रचितगडाची स्वच्छता मोहीम

कडवई : सह्याद्रीच्या दुर्गापैकी एक असलेला किल्ला म्हणजेच संगमेश्वर तालुक्यातील बलदंड प्रचितगड होय. या किल्ल्यावर २५ व २६ऑक्टोबर रोजी संगमरत्न फाऊंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रचितगड सह्याद्रीच्या अभेद्य रांगेतून काहीसा बाहेर सुटलेल्या या किल्ल्याला दुर्गस्थापत्यातील अनमोल रत्न म्हणावे लागेल. नैसर्गिकरित्या लाभलेल्या तासीव कड्यांसोबतच अभेद्य तटबंदी, खडकात खोदलेली पाण्याची टाकी, देखणे प्रवेशद्वार आणि पूर्वेकडून दुर्गाला लाभलेले सह्याद्रीचे संरक्षण असे सगळे अलंकार लेवून हा गड उभा आहे, परंतु मराठी राज्याच्या अस्तानंतर कमालीचे दुर्लक्ष आणि ऊन-वारा-पाऊस यांचे अव्याहत होणारे आघात यामुळे या किल्ल्याची पडझड झाली, वाटा मोडल्या, इमारती ढासळल्या. गडाचे दिवस फिरले. पण आता याच गडाचे नशीब उजळले आहे. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची तळमळ असलेल्या मंडळींनी स्थापन केलेल्या संगमरत्न फाउंडेशनकडून २५ व २६ ऑक्टोबर रोजी गडाची तिसरी स्वच्छता मोहीम
आखली आहे. संगमरत्नचे शिलेदार या दोन दिवसात श्रमदान करून गडाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देणार आहेत. कार्य खूप मोठे आहे, पण या मंडळींची जिद्द त्याहून जास्त आहे.

प्रचितगडाच्या याअगोदर दोन मोहिमा झाल्या आहेत. पहिल्या मोहिमेत गडाचे मुख्य प्रवेशद्वार दगड मातीने बुजलेले होते ते मोकळे करण्यात आले. गडावर वाटा साफ करण्यात आल्या तर दुसऱ्या मोहिमेत बाजूला मुख्य प्रवेशद्वारच्या असलेल्या बुरुजाचे काम करण्यात, सदर बुरुज ७-८ फूट खोल दगड मातीने बुजलेला होता, अजून बुरुजाचे काम बाकी आहे, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. गडावरील प्रत्येक मोहीम इतिहास, पुरातत्वशास्त्र, गड किल्ले, दुर्गसंवर्धन अभ्यासक, डॉ. सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात घेत आहेत.

तिसऱ्या मोहिमेत गडाकडे जाणाऱ्या वाटेवरील अनावश्यक गवत आणि झुडपे काढणे, गड वाट मार्गावरील पडलेल्या दगडगोट्यांसारख्या अडथळ्यांना बाजूला करणे, गडावरील वाटा मोकळ्या करणे, गडावरील मंदिर परिसर साफसफाई करणे, गडावरील पाण्याच्या टाक्याभोवती वाढलेलेअनावश्यक गवत साफ करणे अशी कामे केली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रचितगड श्रमदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहे. आपणा सर्वांना एकत्र येऊन, या ऐतिहासिक गडाचा सन्मान राखण्याची आणि त्याचे संरक्षण, संवर्धन करण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक पाऊल, प्रत्येक श्रम आपल्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी असेल. आपल्या मातीतला प्रत्येक गड आपल्याला पुकारतोय ! इतिहासाच्या पाऊलखुणांवर लक्ष देऊया, चला.. त्यांना जतन करूया आणि भावी पिढीला त्याचं महत्त्व पटवून देऊया. आता वेळ आली आहे गडकिल्ल्यांचे वैभव पुन्हा उभे करण्याची, आपल्या इतिहासाशी नाळ जुळवण्याची आणि महाराजांच्या संस्कृतीचे स्मरण करण्याची !-अल्पेश सोलकर, संगमरत्न फाउंडेशन

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:59 PM 20-Oct-25