Chiplun : मटण-मच्छीमार्केटमधील ४३ गाळ्यांच्या ई-लिलावाला सुरुवात

चिपळूण : चिपळूण पालिकेने मटण-मच्छीमार्केटमधील ४३ गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या गाळ्यासाठी किमान अनामत रक्कम दोन लाख रुपये असून, किमान भाडे साडेतीन हजारांच्या आसपास आहे. विविध कारणाने वादात सापडलेले हे मटण मच्छीमार्केटमधील गाळ्यांच्या लिलावात व्यापारी किती सहभाग घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून पडीक असलेल्या मटण व मच्छीमार्केट इमारतीची दुरूस्ती झाल्यानंतर पालिका प्रशासनाने गाळ्यांचा लिलाव जाहीर केला आहे. ३० वर्षासाठी येथील ४३ गाळे भाड्याने देण्यात येणार आहेत.

विविध कारणाने वादात सापडलेल्या या इमारतीमधील गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत मटण व मच्छीविक्रेते व्यावसायिक तसेच व्यापारी कितपत सहभागी होणार, याकडे लक्ष लागले रस्त्याच्या समोर असलेले १ ते १५ गाळ्यांपैकी अनुसूचित जातीजमातींपैकी व भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी आणि दिव्यांग व्यक्तीसाठी प्रत्येकी १ असे २ गाळे आरक्षित ठेवले आहेत. या गाळ्यांचे क्षेत्रफळ १४.६२५ चौ. मी. असून, नापरतावा अमानत रक्कम २ लाख ७१ हजार ८९ रुपये भरावी लागणार आहे.

गाळ्यांचे मासिक भाडे ३६५० रुपये आहे. मच्छीमार्केटच्या १ ते १० गाळ्यांमधील पहिला गाळा दिव्यांगासाठी आरक्षित ठेवला आहे. या गाळ्यांसाठी ना परतावा अनामत रक्कम २ लाख १७ हजार ५२३ रुपये आहे. १ ते १८ मटणमार्केट गाळ्यांमधील १ गाळा आरक्षित आहे. या गाळ्यांसाठीही मच्छीमार्केटप्रमाणेच अनामत रक्कम भरावी लागणार आहे. मटण व मच्छीमार्केटच्या गाळ्यांचे मासिक भाडे २९०० रुपये ठेवण्यात आले आहे.

उत्पन्नाचे नवे साधन
एकूण ३० वर्षांसाठी हे गाळे ई-लिलाव प्रक्रियेने भाड्याने देण्यात येणार आहेत. या प्रक्रियेत व्यावसायिक सहभागी झाल्यास पालिका प्रशासनाला उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार आहे. शिवाय रस्त्याच्याकडेला बसणाऱ्या मटण व मच्छीमार्केट व्यावसायिकांची संख्या कमी होईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:32 PM 20-Oct-25