रत्नागिरी : राज्य शासनाने गेल्या काही वर्षांपासून अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांकरिता ठराविक सणांसाठी ‘आनंदाचा शिधा’ १०० रूपयांत देण्याची योजना सुरू केली होती. पण या योजनेत खंड पडला असून, यंदा या लाभार्थ्यांची दिवाळी ‘आनंदाच्या शिधा’ विना साजरी करावी लागणार आहे.
‘आनंदाचा शिधा’ या योजनेची सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये केली होती. या योजनेचा उद्देश राज्यातील गरीब कुटुंबांना सणासुदीच्या काळात १०० रुपयांत शिधा किट उपलब्ध करून देणे हा होता. दिवाळीसाठी ही योजना जाहीर करण्यातआल्याने यात दिवाळी सणासाठी १०० रुपयांमध्ये अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य आणि अंत्योदय लाभार्थ्यांना रवा, चणाडाळ, साखर, पोहे आणि पामतेल हे पदार्थ दिले जात होते. त्यानंतरही गुढीपाडवा, होळी, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या काळात ही योजना सुरू होती.
मात्र, यंदा गणेशोत्सवात ‘आनंदाचा शिधा’ योजनेचा लाभमिळाला नाही. त्यानंतर आता दिवाळीतही या योजनेचा लाभदेण्याबाबत शासनाकडून कुठलीच सूचना न आल्याने शासनाने जाहीर केले नसले तरी ‘आनंदाच्या शिधा’लाही कात्री लावण्यात आल्याचे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचे ११ लाख ३१ हजार इतके लाभार्थी आहेत. या योजनेमुळे केवळ १०० रुपयांत प्राधान्य आणि अंत्योदय लाभार्थ्यांना रवा, चणाडाळ, साखर आणि पामतेल हे पदार्थ मिळत होते. त्यामुळे यात गरजूंची दिवाळी आनंदाने साजरी होत होती. मात्र, यंदा ही योजना आर्थिक अडचणीमुळे बंद झाली असल्याने या गरजू लाभार्थ्यांना बाजारभावाने फराळाचे साहित्य आणून दिवाळी साजरी करावी लागणार आहे. लाडक्या बहिणीमुळे या योजनेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे या योजनेसाठी अर्थसंकल्पातच तरतूद करण्यात आलेली नसल्याने ही योजनाही बंद करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:50 PM 20-Oct-25














