Ratnagiri : रत्नागिरीत नोव्हेंबरमध्ये रंगणार जिल्हा साहित्य संमेलन!

गणपतीपुळे : मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत २२ नोव्हेंबर रोजी जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये युवकांसाठी काव्यवाचन तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ४ विभागांत होणार असून या स्पर्धेसाठी युवाशक्ती – नवभारताची कवच-कुंडलं, समाजातील बदल / संवेदना आणि संघर्ष, ऑपरेशन सिंदूर : गाथा अभिमानाची, अभिजात भाषा मराठी : मी मराठी, मायमराठी या विषयांना अनुसरून काव्यलेखन व वाचन स्पर्धा होणार आहेत.

उत्तर विभागासाठी (मंडणगड, खेड, दापोली) १० नोव्हेंबर रोजी वराडकर बेलोसे कॉलेज दापोली, पश्चिम विभागासाठी (गुहागर, चिपळूण) डी. बी. जे. कॉलेज चिपळूण येथे ११ नोव्हेंबर रोजी, दक्षिण विभागासाठी (लांजा, राजापूर): ओणी हायस्कूल राजापूर येथे १२ नोव्हेंबर तसेच मातृ विभागासाठी (रत्नागिरी, संगमेश्वर) नवनिर्माण महाविद्यालय रत्नागिरी येथे १३ नोव्हेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व नवोदित कवी (वय मर्यादा १६ ते ३५ वर्षे) सहभागी होऊ शकतील. कविता मराठी भाषेतच असावी.सादरीकरणासाठी ३ मिनिटांचा वेळ दिला जाईल. कवितेची सुवाच्च अक्षरात लिहिलेली/टंकलिखित एक मूळ प्रत आयोजक व परीक्षकांना स्पर्धेआधी द्यावी लागेल. ही स्पर्धा चार विभागांत घेतली जाईल.

सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील ४ विजेत्यांना (एकूण १६ कवी) रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनामध्ये युवा काव्यसंमेलनात कविता सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. जिल्हा साहित्य संमेलनात विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कवी अरुण मोर्ये यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कनिष्ठ गटामध्ये अभिजात माय मराठी व मला प्रभावित केलेले मराठी पुस्तक असे निबंधाचे विषय असून यासाठी ५०० ते ७०० शब्दमर्यादा असेल. वरिष्ठ गटामध्ये कोकण बोलीभाषांचे माहेरघर, अभिजात मराठी आणि माझी जबाबदारी हे दोन विषय असून यासाठी ७०० ते १००० अशी शब्द मर्यादा राहणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपले नाव, कॉलेजचे नाव, संपर्क क्रमांक नमूद करून आपला निबंध ५ नोव्हेंबरपर्यंत प्राचार्य एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय रत्नागिरी या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. संदीप कांबळे, संजय वैशंपायन व प्रा. सचिन टेकाळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:57 PM 20-Oct-25