Ratnagiri: आंबा-काजू बागायतदारांना विमा परताव्याचे १०० कोटी मंजूर

रत्नागिरी : आंबा-काजू बागायतदारांना दिवाळीच्या पूर्वसंध्येला विमा परतावा रक्कम मंजूर झाली असून टप्प्याटप्प्याने ती बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३६ हजार ४६८ आंबा-काजू बागायतदारांनी मागील वर्षी विमा उतरवलेला होता. त्याअंतर्गत १०० कोटी ६१ लाख १४ हजार ५९३ इतकी रक्कम मंजूर झाली आहे. त्यामुळे बागायतदारांची दिवाळी गोड झाली आहे. उशिरा का होईना, पण पुढील हंगामाच्या तोंडावर विमा परतावा मिळाल्याने बागायतदारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे नुकसान भरून निघावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने फळपीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून विशिष्ट रक्कम हप्त्यापोटी घेतली जाते. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हजार १३५ आंबा बागायतदार आणि ३ हजार ३३३ काजू बागायतदारांनी विमा उतरवला होता. एकूण १८ हजार ०२४ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. शेतकऱ्यांनी हप्त्यापोटी २१ कोटी ७४ लाख भरले, तर केंद्र, राज्य आणि शेतकरी मिळून एकूण १०८ कोटी ५४ लाख रुपये विमा कंपनीला देण्यात आले होते.

हंगाम संपल्यानंतर १५ दिवसात ट्रिगरची माहिती संकलित करून ४५ दिवसांत परतावा देणे बंधनकारक आहे. मात्र तीन महिने उलटल्यानंतरही कंपनीकडून कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले. त्याची गंभीर दखल बंदरे व मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री नीतेश राणे यांनी घेतली. त्यांनी तातडीने मंत्रालयात बैठक घेऊन ‘दिवाळीपर्यंत परतावा मंजूर करावा,’ अशा सूचना दिल्या. त्यानंतर विमा कंपनीकडून कार्यवाहीला वेग आला. चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विमा मंजूर झाला, तर रत्नागिरी जिल्ह्याच्या परताव्यास दोन दिवस विलंब झाला.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच रविवार सुटी असूनही, मंजूर रक्कम बागायतदारांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील हंगामात शेवटच्या टप्प्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून मदतीची अपेक्षा होती; ती पूर्ण न झाल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. मात्र, विमा परतावा मंजूर झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे ते सांगत आहेत.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात काजूसाठी एकाही बागायतदाराला विमा परतावा मंजूर झालेला नाही. तसेच, सर्वाधिक आंबा क्षेत्र असलेल्या या तालुक्यात तुलनेने विमा रक्कमही कमी मिळालेली आहे. संगमेश्वर, लांजा, मंडणगड या तालुक्यांमध्ये आंबा क्षेत्र कमी असतानाही अधिक परतावा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील पाली, पावस परिसरातही परतावा रकमेतील तफावत निदर्शनास आली आहे.

बागायतदारांच्या विमा परताव्याची रक्कम थेट बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. २ ते ३ दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल. महसूल मंडळनिहाय बसविण्यात आलेल्या हवामान केंद्रांवरील नोंदीनुसार विमा परतावा मंजूर झालेला आहे. त्यानंतर कोणत्या मंडळात कोणता ट्रिगर लागू झाला आहे, हे स्पष्ट करता येईल. – डॉ. शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

मागील हंगामात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही ठिकाणी उच्च तापमानाची नोंद झाली होती. कोणत्या महसूल मंडळात ट्रिगर अ‍ॅक्टिव्ह झाला आहे, याची माहिती विमा कंपनीने आठ ते दहा दिवसांत जाहीर केली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना सविस्तर माहिती मिळू शकेल. महसूल मंडळनिहाय नोंदवलेल्या तापमानाची माहिती दिल्यास विमा परताव्यात पारदर्शकता राहील. तसेच शेतकरी भरलेला हिस्सा आणि शासनाने भरलेला हिस्सा यांचा ताळेबंद लागत नाही. तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा कमी लाभ मिळत आहे. – राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

विमा उतरवलेले शेतकरी तालुकानिहाय
तालुका* शेतकरी संख्या
रत्नागिरी* ५३६७
लांजा* ३६१७
चिपळूण* ३६१७
राजापूर* ४५४७
गुहागर* २०३३
संगमेश्वर* ६७३७
खेड* ३७९१
दापोली* २४९६
मंडणगड* ४५४७

आंबा-काजू बागायतदारांना प्राप्त झालेला विमा परतावा रक्कम तालुकानिहाय (रूपयांमध्ये)
तालुका* काजू* आंबा
चिपळूण* ८३ लाख ४४ हजार* १० कोटी ६२ लाख ८० हजार
दापोली* २५ लाख ७६ हजार* २ कोटी २९ लाख ३८ हजार
गुहागर* २४ लाख ५२ हजार* ४ कोटी ८६ लाख ५ हजार
खेड* ३२ लाख ५१ हजार* ८ कोटी ५८ लाख ६४ हजार
लांजा* १ कोटी ६१ लाख ७१ हजार* १० कोटी ४४ लाख १७ हजार
मंडणगड* १२ लाख ४४ हजार* १३ कोटी ६१ लाख ८८ हजार
राजापूर* १ कोटी २० लाख ५१ हजार* १८ कोटी १२ लाख १९ हजार
रत्नागिरी* ०* ८ कोटी २१ लाख ९५ हजार
संगमेश्वर* २ कोटी ८१ लाख ४१ हजार* १६ कोटी ४१ लाख ६८ हजार

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 21-10-2025