Ratnagiri : भात कापणी-झोडणीस वेग..

कडवई : संगमेश्वर तालुक्यातील कडवई परिसरात यंदा पावसाच्या वाढलेल्या कालावधीमुळे भात तयार होऊनही भात कापणीला उशीर झाला, परंतु गेले दहा दिवस चांगले ऊन पडत असल्याने भात कापणी व झोडणीच्या कामाला वेग आला आहे. १५ ऑक्टोबरला अचानक आलेल्या वादळी पावसामुळे कापणीची कामे खोळंबली, परंतु शेतकऱ्यांनी पुन्हा कापणीच्या कामाला सुरुवात केली आहे. गावात मजुरांच्या कमतरतेमुळे आपल्या घरातील व नात्यातील लोकांना मदतीला घेऊन कामे आवरण्याचे काम सुरू आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्याने काही चाकरमानी भात कापणीला गावी दाखल होतात. त्यांच्याबरोबर मुंबईत राहणारी सुशिक्षित तरुण पिढीही कामाला मदत करत असल्याचे एक आशावादी चित्रदेखील पहावयास मिळत आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे बरेचसे शेतकरी भात कापून झाले की शेतातच ताडपत्री नेऊन भात झोडून घेताना दिसत आहेत. पूर्वीसारखे शेतात खळे तयार करून भात झोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे.

काही शेतकरी भात कापून लगेच न झोडता अडवी रचून उन्हाळा सुरू झाला की भात झोडणी करतात. तापमान वाढू लागल्यामुळे सकाळी लवकर उठून व रात्री लाईट लावून भात कापणी करणारेदेखील खूप आहेत. दिवाळी सुरू झाली तरी वर्षभर कष्ट करून पिकविलेले भातरुपी धन लवकरात लवकर घरी घेऊन जाण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची घाई सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:03 PM 21-Oct-25