आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याला भाजपचा सलाम; ‘स्वदेशी’ दिवाळी फराळ देत ‘आत्मनिर्भर भारता’चा दिला संदेश

◼️ भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांचा विशेष पुढाकार

रत्नागिरी : दिवाळीच्या मंगलमय प्रसंगी, रत्नागिरी शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे एक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ दिवाळी फराळ न देता, त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या “आत्मनिर्भर भारत” आणि “स्वदेशी वापरा” या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यात आले. आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना स्वदेशी बनावटीच्या आकर्षक बॅगमध्ये दिवाळी फराळ आणि दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून रत्नागिरीतून ‘स्वदेशीचा संदेश’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्याची प्रेरणा देण्यात आली.

हा संपूर्ण कौतुक सोहळा माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब तसेच जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. रत्नागिरी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कष्ट करणाऱ्या नगरपरिषद आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाचे तोंड गोड करणे आणि त्यांच्या अमूल्य कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला आरोग्य विभागातील एकूण १५५ कर्मचारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीकडून मिळालेला हा सन्मान आणि दिवाळी भेट स्वीकारताना कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला. फराळ मिळाल्यानंतर त्यांच्या समाधानाची झलक स्पष्टपणे दिसून येत होती. “आमच्या कामाचे कौतुक झाल्यामुळे खूप बरे वाटले,” अशा उत्स्फूर्त भावना अनेक कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. सत्यवती बोरकर, नितीन गांगण, प्रसाद बाष्ट्ये, केतन कडू, सिद्धेश कडू, विजय माळवदे, सौ. कामना बेग, मनोर दळी तसेच भारतीय जनता पार्टीचे इतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले व ते आवर्जून उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:07 21-10-2025