Ratnagiri: ‘मोबाईल’ला दूर ठेवत चिमुकल्यांनी उभारले गड-किल्ले; संजीवन प्रतिष्ठानच्या ‘छोटे किल्लेदार’ स्पर्धेला उदंड प्रतिसाद

◼️ भाजप तालुका अध्यक्ष दादा दळी यांच्या वतीने गेली ७ वर्षे स्पर्धेचे यशस्वी आयोजन

चांदेराई (रत्नागिरी): दिवाळीच्या सुट्टीत मुले मोबाईल आणि टीव्हीमध्ये व्यस्त न राहता, त्यांनी आपल्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करावे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख करून घ्यावी आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे, या उदात्त हेतूने संजीवन प्रतिष्ठान, चांदेराईतर्फे ‘दुगोत्सव २०२५’ अंतर्गत ‘छोटे किल्लेदार’ या किल्ला बनवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला मुलांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भाजपचे तालुका अध्यक्ष दादा दळी यांची सामाजिक संस्था असलेल्या ‘संजीवन प्रतिष्ठान’च्या माध्यमातून दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत हा अभिनव उपक्रम राबवला जातो. गेल्या सलग ७ वर्षांपासून ही स्पर्धा अखंडितपणे सुरू आहे. मुलांमध्ये शिवाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख व्हावी, सुट्टीच्या काळात मुले मोबाईलच्या अतिवापरापासून लांब रहावीत, त्यांना गड-किल्ल्यांची शास्त्रीय माहिती व्हावी आणि नवीन पिढीमध्ये या विषयी आवड निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.

ही स्पर्धा हरचेरी-कर्ला जिल्हा परिषद गट मर्यादित ठेवण्यात आली होती. या गटातील हरचेरी, चांदेराई, कोंडवी, उमरे लावगणवाडी, टिके कांबळे वाडी, फुटकवाडी, आणि झरेवाडी या गावांमधील अनेक चिमुकल्यांनी या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. या मुलांनी एकत्र येऊन तब्बल ४५ किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवल्या.

या ‘छोट्या किल्लेदारांनी’ आपल्या कल्पकतेने तोरणा, राजगड, रायगड, शिवनेरी, वासोटा, मुरुड जंजिरा, पद्मावती, सिंधुदुर्ग, प्रतापगड अशा अनेक प्रसिद्ध आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या सुबक प्रतिकृती साकारल्या.

संजीवन प्रतिष्ठानच्या वतीने काल, दिवाळीच्या दिवशी (दिनांक २० ऑक्टोबर) या सर्व किल्ल्यांचे परीक्षण करण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उद्या, दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. या उपक्रमामुळे मुलांनी सुट्टीचा सदुपयोग करत इतिहास आणि संस्कृतीशी नाळ जोडल्याबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 21-10-2025