Mandangad : तिडे-तळघर ग्रामपंचायतीतर्फे किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षण

मंडणगड : जळगाव येथील सह्याद्री फाउंडेशन आणि ग्रुप ग्रामपंचायत तिडे-तळेघर यांच्या संयुक्त विद्यमाने १५ व्या वित्त आयोगांतून किशोरवयीन मुलामुलींसाठी गुड टच-बँड टच या विषयावर मार्गदर्शन झाले. तिडे-तळेघर येथे झालेल्या या प्रशिक्षणावेळी सह्याद्री फाउंडेशनच्या सदस्या आणि प्रा. सुप्रभा सामंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ म्हणजे काय, ते कसे ओळखावे आणि अशा प्रसंगी स्वतःचे रक्षण कसे करावे याविषयी सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी अशा संवेदनशील विषयांवर मुक्त चर्चा घडवून आणली. या कार्यक्रमात श्रद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. सुमन व्यास आणि डॉ. श्रद्धा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आजारी विद्यार्थ्यांना आवश्यक औषधांचे वाटपही करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीतील तिडे नं. १, तिडे बौद्धवाडी, तिडे आदिवासीवाडी, तिडे निमदेवाडी, तिडे उर्दू आणि तळेघर या शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत तिडे तळेघरच्या सरपंच मुमताज धनसे, उपसरपंच राजेंद्र जाधव, सह्याद्री फाउंडेशनचे अजय पालकर, केंद्रप्रमुख राजेंद्र येरुणकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 21-Oct-25