मातृभाषेतून शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली : मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे

रत्नागिरी : प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून झाल्यास मुलांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात, हे साऱ्या जगाने मान्य केले असून, त्या दृष्टीने आपण भाग्यवान मुलं आहात, असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

शहरातील दामले विद्यालय आयोजित एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विस्तार अधिकारी संदेश कडव, नगर परिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे, मुख्याध्यापक भगवान मोटे, जुलेखा काझी आदी उपस्थित होते. यावेळी वैदेही रानडे म्हणाल्या, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे आयुष्यात केव्हाच अडचण आली नाही. आयुष्यात आपण जी गोष्ट करायची ठरवू, ती सर्वोत्तम केल्यास यश निश्चितपणे आपल्या सोबत येते. शालेय जीवनापासूनच भविष्यात आपण कोण होणार, हे ध्येय निश्चित केले पाहिजे. भविष्यात शिक्षणाच्या असंख्य शाखा उपलब्ध आहेत, त्याविषयी विद्यार्थ्यांनी जाणून घेणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांत वेगळा गुण आहे, तो ओळखून त्याला तशी संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी केलेल्या संस्कृत भाषेतील स्वागताने त्या भारावल्या. यावेळी विस्तार अधिकारी श्री. कडव म्हणाले, विद्यार्थ्यांनी विज्ञानातील छोट्या-छोट्या गमतीजमती समजून घेऊन अभ्यासाची आवड जोपासली पाहिजे. तसेच पुढील आयुष्यात स्पर्धा परीक्षांचा मार्ग आपण निवडायला हवा. कारण पुढे स्पर्धा अधिक कठीण असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. तर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्यासाठी पालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न यावर प्रशासन अधिकारी प्रा. मुरकुटे यांनी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण यावर लक्ष देत विद्यार्थी विकासाचे आपले ध्येय पूर्ण करावे, असे मत व्यक्त केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:13 PM 21-Oct-25