‘भाजप प्रवेशासाठी रवींद्र चव्हाणांच्या पीएला का भेटलात?’; उदय सामंतांचा उबाठा नेत्याला थेट सवाल

रत्नागिरी: रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने आज पोलीस मुख्यालय येथे ‘पोलीस स्मृती दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महायुतीच्या समीकरणांवरून स्फोटक वक्तव्य केले. “महायुतीतच लढावे ही आम्हा सर्वांची इच्छा आहे, पण शांत आहोत याचा अर्थ हतबल आहोत, असा नाही. कुणाला खुमखुमी असेल तर आम्ही धनुष्यबाण चालवून दाखवतो,” असा थेट इशाराच त्यांनी दिला. याचवेळी त्यांनी उबाठा सेनेच्या नेत्यावरही जोरदार प्रतिहल्ला चढवला.

“शांत आहोत, पण हतबल नाही”

महायुतीच्या भवितव्यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती व्हावी, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी माझी चर्चाही झाली आहे. परंतु, स्थानिक पातळीवरच्या काही लोकांनी जी तोंडं सोडलेली आहेत, ते योग्य आहे असे मला वाटत नाही.”

काही स्थानिक नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेताना ते म्हणाले, “काल नितेश राणे यांना सिंधुदुर्गात प्रश्न विचारला असता त्यांनी अतिशय समर्पकपणे उत्तर दिले, तसेच सगळ्यांनी दिले पाहिजे. काही लोकं म्हणतात आम्ही इकडे फिरायला देणार नाही, तिकडे फिरायला देणार नाही, आम्ही आता नव्याने आलोय म्हणून चिपळूणमध्ये घुसायला देणार नाही. असं असतं का? काही लोकांची राजकीय हयात सात-आठ वर्षांची आहे. मी सत्ताविसाव्या वर्षी आमदार झालोय, मी रत्नागिरी जिल्हा कोवळून पियालोय.”

याच आक्रमक पवित्र्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांचा आदर करतो, त्यांना महायुतीत कुठेही त्रास होऊ नये याची आम्ही दक्षता घेतो. माझ्या एखाद्या वागण्यामुळे एकनाथ शिंदेना त्रास होऊ नये याची मी दक्षता घेतो. मात्र, शांत आहोत याचा अर्थ हतबल आहोत असा नाही. त्यामुळेच मला नाईलाजाने चिपळूणमध्ये सांगावे लागले की, कुणाला जर खुमखुमी असेल तर आम्ही धनुष्यबाण चालवून दाखवतो.”

रत्नागिरीचे मॉडेल सिंधुदुर्गावर अवलंबून

युतीचा फॉर्म्युला स्पष्ट करताना सामंतांनी रत्नागिरीतील जागावाटप सिंधुदुर्गावर अवलंबून असल्याचे सूचक विधान केले. ते म्हणाले, “सिंधुदुर्गात, रायगड मध्ये काय होते हे देखील बघावे लागेल. सिंधुदुर्गातील युतीवर देखील रत्नागिरीचे अवलंबून आहे. जर सिंधुदुर्गात आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले, मान-सन्मान दिला तर तसेच मॉडेल आम्ही रत्नागिरीत राबवू. मी जे परवा बोललो, त्यामध्ये कुणाला दुखावण्याचा हेतू नव्हता. पण तालुका, जिल्हा स्तरावरील काही मंडळी आक्रमकतेने बोलतात, त्याने मनं दुखावली जातात याची दक्षता सर्वांनी घेतली पाहिजे.”

उबाठा नेत्यावर हल्लाबोल

यावेळी सामंत यांनी उबाठा सेनेचे नेते बाळ माने यांचे नाव न घेता त्यांच्यावरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “आता उबाठाच्या काही लोकांनी मध्ये पत्रकार परिषद घेतली, जे चार वेळा माझ्यासमोर उभे होते. जसं मुघलांच्या काळात संताजी-धनाजी कुठेही गेल्यानंतर दिसायचे, तसे या लोकांना मी दिसतो. त्यांनी टीका केली की सामंतांना एकनाथ शिंदे साहेब का लागतात? माझा सवाल आहे, तुम्ही उबाठामध्ये असताना मग तुम्हाला रवींद्र चव्हाण यांचे पीए अनिकेत पटवर्धन का लागतात? त्यांच्यामार्फत भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या गोष्टी का करता?”

“काही लोकं भाजपमधील माझ्याकडे पाठवता की, ‘मी भाजपमध्ये येतोय, मला घ्यायला सांगा’ हे कशासाठी? सगळं करून तुम्ही चार वेळा माझ्या विरोधात उभे राहिलेले आहात आणि रत्नागिरीकरांनी तुम्हाला उदय सामंत काय आहे हे दाखवून दिलेलं आहे,” असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, “मी एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व मानतो आणि देशातील भारतरत्नांच्या शिल्पाचा अनावरण सोहळा हा देशातला प्रथम होता, म्हणून एकनाथ शिंदे साहेब रत्नागिरीत आले होते, त्याच्याबद्दल मला अभिमान आहे. पण मी अनिकेत पटवर्धन, जे रवींद्र चव्हाण यांच्याकडे पीए आहेत, त्यांना ‘माझा प्रवेश घ्या, मला काहीतरी द्या’ म्हणून कधीच गेलो नाही. उलट, ‘ह्यांना बीजेपी मध्ये जाताना अडचण करू नका’ हे सांगायला माझ्याकडे जे काही आले, त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. त्यामुळे राजकीय शहाणपण उगाच मला कोणी शिकवू नये,” असा घणाघात सामंत यांनी केला.

“ज्यांना कोणाला त्यांना उभं करायचं आहे, अजून काय राजकारण करायचे आहे, त्यांनी ते करावे. शेवटी लोकशाहीत तो एक भाग आहे, पण व्यक्तिगत टीका करू नये. त्यांना माझ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलेलं आहे. मात्र एक गोष्ट नक्की की आम्हाला महायुतीनेच लढायचं आहे,” असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.