Fish : पापलेट, बांगड्याचे दर अजूनही वधारलेलेच

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदी उठल्यानंतर पापलेट आणि बांगडा मच्छीमार नौकाना फारच कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे या दोन्ही माशांचे दर स्थिर आहेत. रविवारी पापलेट १२०० ते १३०० रुपये किलो दराने तर ७० ते ८० रुपये किलो दराने मिळणारा बांगडा १२० ते १५० रुपये किलो दराने विकला जात आहे. सुरमई, सरंग्याचे दर मात्र आवाक्यात आहेत.

पर्ससीन नेट मच्छीमार नौका बांगडा आणि म्हाकूळ पकडतात. या पर्ससीन नौकाना ही मासळी फारच क्वचित वेळी चांगल्या प्रमाणात मिळतात. १ सप्टेंबरपासून पर्ससीन नेट मासेमारी सुरू झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातील एका आठवड्यात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळाला होता. त्यामुळे हा बांगडा त्यावेळी ७० ते ८० रुपये किलो दराने मिरकरवाडा बंदरात विकला जात होता. आता मात्र या बांगड्याचा किलोचा दर १२० ते १५० रुपये इतका आहे.

पर्ससीन नेट मच्छीमार नौकांव्यतिरिक्त इतर फिशिंग नौकांना सध्या सरंगा, सुरमई मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे मोठ्या सुरमईचा एक किलोचा दर ४०० ते ४५० रुपये आहे. गेल्या महिन्यात हीच सुरमई ६०० ते ७०० रुपये किलो दराने मिळत होती. त्याचबरोबर ७०० ते ८०० रु. किलो दराने मिळणारा सरंगा मिरकरवाडा बंदरात ५०० रु. किलो दराने विकला जात होता. सौंदाळ्याचे दरही बऱ्यापैकी आवाक्यात आहेत. मोठे सौंदाळे २०० ते २५० रु. किलो दराने विकले जात होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:08 PM 21-Oct-25