Ratnagiri : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात दाखल झाल्या दहा ई-बसेस

रत्नागिरी : इंधनावरील खर्च कमी करण्याबरोबर पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने ५,१५० ई-बसेस ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महामंडळातर्फे ई-बसेस प्रत्येक विभागात पुरविण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एकूण १५२ बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी दहा बसेस दापोली आगारात दाखल झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेकरिता किमान महिनाभर प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

दापोली आगारातील चार्जिंग सेंटरचे काम पूर्ण झाले असले तरी उर्वरित खेड, चिपळूण, रत्नागिरी आगारातील चार्जिंग सेंटरचे काम सुरू आहे. रत्नागिरी आगारासाठी ४०, दापोली ३२, तर खेड व चिपळूणसाठी प्रत्येकी ३५ मिळून एकूण १५२ ई-बसेसची मागणी आहे. टप्प्याटप्प्याने बस उपलब्ध होणार आहेत.

भाड्याच्या बसेस
महामंडळाने इंधन खर्च व पर्यावरण हानी कमी करण्याच्या दृष्टीने ई-बसेस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला असला तरी या बसेस खासगी कंपनीकडून भाड्याने घेतल्या आहेत. त्यामुळे बसेससाठी चालकही खासगीच असणार आहेत. २७५ चालकांची त्यासाठी मागणी आहे. चालक उपलब्ध झाल्यानंतर या बसेस नियोजित मार्गावर धावणार आहेत.

ई-बसेसचा वातानुकूलित प्रवास
ई-बसेस वातानुकूलित असून, प्रवाशांसाठी प्रवास आरामदायी व सुखाचा असणार आहे. मात्र, या बसेसचे प्रवासी भाडे साध्या गाड्यांपेक्षा जास्त असून, त्यामुळे या गाड्यांसाठी प्रवाशांचा कितपत प्रतिसाद लाभेल ही मात्र शंका आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी मात्र या गाड्यांचा वापर फायदेशीर ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:59 PM 21-Oct-25