रत्नागिरी : चालू मासेमारी हंगामामध्ये मच्छीमारांच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी शासनाने जाहीर केलेली विशेष मदत ही नुकसानीच्या तुलनेत तुटपुंजी असून त्यांच्यासाठी भरीव पॅकेजची तरतूद करावी, अशी मागणी मच्छीमार नेते विठ्ठल ऊर्फ बावा भालेकर यांनी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
१ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरु झाला. मासेमारी हंगाम सुरु झाल्यापासूनच समुद्रामध्ये सातत्याने वादळ सदृष्य परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे १ ऑगस्टला मासेमारी सुरु होऊनसुद्धा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये समुद्रात निर्माण झालेली वादळसदृष्य परिस्थिती व प्रचंड पाऊस यामुळे हंगामातील जास्तीत जास्त मासे मिळण्याच्या काळात मासेमारी न झाल्यामुळे मच्छीमारांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
३ महिने मासेमारीविना नुकसान झाल्याचा विचार करता भरपाई देताना नौकांच्या क्षमतेप्रमाणे ६ सिलेंडर इंजिन असलेल्या नौकांना, ४ सिलेंडर नौकांना, २ सिलेंडर नौकांना, १ सिलेंडर नौकांना व बिगर यांत्रिक नौका अशा विगतवारी प्रमाणे नुकसान भरपाईचे निकष ठरवावेत. मच्छीमार संस्थेचे मच्छीमार सभासद व मासे विक्रेत्या महिला सभासद यांनाही नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष मदत पॅकेजमध्ये समाविष्ट करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 22/Oct/2025














