Dapoli : जालगाव बाजारपेठेत वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान

दापोली : तालुक्यातील जालगाव बाजारपेठ येथे काल (ता. २१) रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घरावर वीज पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. मंगळवारी दुपारी अचानक गडगडाटासह हलका पाऊस सुरू झाला. याचवेळी जालगाव बाजारपेठेत वीज पडून सहा ग्रामस्थांचे इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जालंगावचे तलाठी बोरसे, पोलिसपाटील धीरज कदम, कोतवाल अनिकेत पाते यांनी पंचनामा केला आहे.

त्यानुसार सुजय मेहता, अरविंद तलाठी, महेंद्र शेठ यांचा इन्व्हर्टर, तर चंद्रशेखर बुटाला यांच्याकडील टी. व्ही. आणि इन्व्हर्टर, सूर्यकांत आपटे यांच्याकडील चार पंखे, संदीप तलाठी यांच्याकडील सीसीटीव्ही, काजू फॅक्टरीमधील ड्रायर तसेच केतन आपटे यांच्या घरातील इन्व्हर्टर जळाला. छताला लावलेले पॅनल लाईट जळून खाली पडले. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जालगाव बाजारपेठेत विजेच्या फटक्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होऊन उत्साहावर विरजण पडले. ही प्रवाही वीज फक्त जालगाव बाजारपेठेतून काही क्षणात निघून निर्जन ठिकाणी कोसळली. जर ही वीज याच गजबजलेल्या भागात पडली असती, तर मोठा अनर्थ घडला असता. दुपारी याचदरम्यान दापोली तालुक्याच्या काही भागांत पाऊस कोसळला. मात्र, जालगावमध्ये जेथे विजेचा फटका बसला त्या परिसरात कडक ऊन पडले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 22/Oct/2025