Diwali Lakshmi Pujan : विजांच्या कडकडाटात लक्ष्मीपूजन;व्यापाऱ्यांनी जपली परंपरा

मंडणगड : मंगळवारी लक्ष्मी पूजनादिवशी मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचे लक्ष्मीपूजन विजांच्या कडकडाटाने साजरे झाले. पावसामुळे बाजारपेठेतील व्यावसायिकांना पूजेचा मुहूर्त साधण्याची कसरत करावी लागली. सायंकाळी साडेसात वाजता रत्नागिरी शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

मंगळवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण होते. मंडणगड तालुक्यात दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. मुसळधार पावसासह विजांचा कडकडाट आणि वेगवान वाऱ्यांमुळे मंडणगडवासीयांना निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. एक तासाहून अधिक काळ पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यासह पाली परिसरात सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. पालीसह बांबर, कशेळी, नाणीज, खानू, कापडगाव, चरवेली, चोरवणे, तर संगमेश्वर तालुक्यातील करंजारी, देवळे या गावांना पावसाचा फटका बसला. एक तासानंतर पाऊस थांबल्यामुळे सर्वांनी निःश्वास सोडला.

दरम्यान, सायंकाळी विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. रत्नागिरीतील रामआळीतील बाजारपेठेत व्यावसायिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. फटाक्यांच्या आतषबाजीऐवजी व्यापाऱ्यांना विजांच्या कडकडाटात पूजा करावी लागली. व्यापाऱ्यांनी दुपारपासूनच लक्ष्मीपूजनाची तयारी केली होती. दुकानदार, व्यापारी, उद्योजक, सुवर्णकार यांची दुकाने सजलेली होती. दुकानाच्याभोवती दिव्याची उजळण केलेली होती. बाजारपेठ सजलेली असताना रत्नागिरी शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

कापलेले भात भिजले, उभी रोपे आडवी
आज अचानक पडलेल्या पावसाने बळीराजाला फटका बसला. कापून ठेवलेले भात, नाचणी पावसात भिजून गेले. पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. तसेच उभे भातपीक वादळाच्या तडाख्याने आडवे पडले. त्यामुळे शेतकरी राजा चिंतेत आहे. आंबा, काजू या पिकांना मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही बागायतदारांमध्ये आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 22/Oct/2025