रत्नागिरी : रत्नागिरी पोलिस दलाकडून पोलिस मुख्यालय येथे २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वा. पोलिस स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित व निर्जन अशा हॉटस्प्रिंग याठिकाणी पोलिस दलातील १० जवान गस्त घालत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याला कडवे आव्हान देत शेवटच्या क्षणापर्यंत पोलिस जवानांनी झुंज दिली आणि ते विरगतीला प्राप्त झाले. या वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी तसेच या कर्तव्याची व राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून शहीद जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभर पोलिस हुतात्मा दिन म्हणून ओळखला जातो.
रत्नागिरी पोलिस दलाकडून १ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत भारतातील विविध पोलिस दलातील एकूण १९१ पोलिस अधिकारी व अंमलदाऱ्यांनी कर्तव्य पार पाडत असताना, प्राणांची आहुती दिली. त्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मंगळवारी श्रध्दांजली देवून स्मरण करण्यात आले. या कार्यक्रमाला उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, कोस्टगार्ड कंमाउंट रोशन लाल, शैलेश गुप्ता, कस्टम विभागाचे असिस्टंट कमिश्नर संदीप कृष्णा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री उदय सामंत यांनी श्रध्दांजली संदेश वाचून दाखवला. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होऊन इतर मान्यवर व जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली दिली.
यावेळी लांजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर, राखीव पोलिस निरीक्षक राजेंद्र कुळसंगे, सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार तसेच इतर पोलिस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 22/Oct/2025














