पावस : नागरिकांनी समुद्रावर जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच कोणीही खोल समुद्रात जाऊ नये आणि स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नये. मद्यपान करून समुद्रावर गाडी चालवू नये आणि अतिउत्साही पर्यटकांनी समुद्रावर जाताना विशेष काळजी घ्यावी. तसेच तिथे असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, महिलांनी विशेष काळजी घेऊनच समुद्रात जावे, अशा सूचना पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम सिंग पाटील यांनी दिल्या आहेत.
दिवाळीच्या सुट्टया आता सुरू झाल्या असून कोकणात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच सहायक पोलिस निरीक्षक विक्रम सिंग पाटील यांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे.
पावस परिसरातील गावखडी, पूर्णगड, गणेशगुळे, वायंगणी आदी परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात. यापार्श्वभूमीवर पोलिस पाटील, सागरी सुरक्षा दल यांच्या आयोजित बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या आहेत. घाटमाथावरून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्राचे विशेष आकर्षण असते. पाण्यात उतरल्यानंतर भान न राहिल्याने बऱ्याचदा दुर्घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे विक्रम सिंग पाटील यांनी सांगितले.
समुद्रावर असणाऱ्या महिलांना कोणी त्रास दिला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे झाल्यास ११२ या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना तत्काळ कळवावे, असे आवाहन समुद्रकिनारच्या नागरिकांना केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 22/Oct/2025














