देवरुख : शहरातील अभिरुची संस्थेच्या वतीने आयोजित केलेली दिवाळी संगीत मैफल उदयोन्मुख गायकांनी सुमधुर गायनाने यादगार केली. येथील लक्ष्मी नरसिंह सभागृहात ही मैफल सजवण्यात आली. वादक कलाकारांचा गौरव व्हावा या हेतूने ही मैफल आयोजित करण्यात आली. यावेळी गायक कलाकार कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले आणि सिद्धी शितूत तसेच तबला अलंकार अथर्व आठल्ये यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, दिवाळी भेट व प्रत्येकी ५ हजारचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
याच अनुषंगाने प्रमुख पाहुणे स्वराधिराज कोकण गंधर्व राजाभाऊ शेंबेकर व तबला विश्वातील गुरुवर्य गिरीधर कुलकर्णी यांचा संगीत साधक शामकांत अळवणी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व दिवाळी भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
मैफलीचा प्रारंभ कुणाल भिडे, नेहा प्रभुघाटे-साधले व सिद्धी शितूत यांनी पंचतुंड नररुंड मालघर या नांदीने केला. कुणाल भिडे याने आपल्या दमदार आवाजात सुखाचे जे सुख, झाले युवती मना दारुण रणरुचिर प्रेमसे.., पद्मनाभा नारायणा अशी एकापेक्षा एक बहारदार गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. नेहा प्रभुघाटे साधले हिने निरुपणा ऐसे नाही समाधान, मतवारो बादल आयो रे, उगवला चंद्र पूनवेचा, बाजे मुरलीया बाजे ही गौते लीलया सादर केली. रसिकांनीही नेहाच्या गीतांना भरभरुन दाद दिली, सिद्धी शितूत हिने मैफलीत रंग भरताना ‘नाथ हा माझा मोही खला, खरा तो प्रेमा, हसले मनी चांदणे., वद जावू कुणाला शरण’ ही गीते सादर केली. सिद्धीच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. मैफलीचा शेवट अगा वैकुंठीच्या राया या कुणाल भिडे यांनी गायलेल्या भैरवीने करण्यात आला.
मैफलीला तबला साथ अथर्व आठल्ये, ऑर्गन चैतन्य पटवर्धन, संवादिनी साथ आदित्य साधले व ताल वाद्य नील भावे यांची साथ लाभली. तबला अलंकार अथर्व आठल्ये याने एकल वादनात दिल्ली घराण्याच्या बाजाने तीन तालातील पेशकार, कायदा, रेला सादर करून तबल्यावरील आपली हुकूमत रसिकांना दाखवून दिली.
अथर्वला चैतन्य पटवर्धन यांची हार्मोनियम साथ लाभली. हार्मोनियम वादक चैतन्य पटवर्धन यांनी लेहरा व नगमा वादन सादर करून सुरांची जादू दाखवून दिली. रसिकांनी या मैफिलीला चांगलीच दाद दिली. अभिरुची संस्थेचे अध्यक्ष आशिष प्रभूदेसाई यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मंगेश प्रभुदेसाई, अप्पा आठल्ये यांनी सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली. मैफलीसाठी प्रसाद गानू, अॅड. समीर आठल्ये, सोहम प्रभुदेसाई, हेरंब कुलकर्णी, शौनक आठल्ये यांनी मैफल यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 22/Oct/2025














