संगमेश्वर : भात कापणीबरोबरच संगमेश्वर तालुक्यात नदीकिनारी आणि पाणी उपलब्ध असलेल्या गावांमध्ये वायंगणी शेती करण्यावर भर दिला जात आहे. खाडीपट्टा आणि परचुरी परिसरातील शेतकऱ्यांनी वायंगणी शेतीच्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. भातशेती कापणीची कामे २५ टक्के पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यांत वायंगणी शेतीला प्राधान्य दिले जात आहे.
भातशेतीपेक्षा वायंगणीशेती ही जास्त प्रमाणात केली जाते. शास्त्री, सोनवी, बावनदी, असावी नदीच्या किनाऱ्यावर गोड्या पाण्यावर ही शेती केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वायंगणी शेतीला प्रारंभ होतो. यावर्षी मुसळधार पावसाने भातशेतीची कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत. मात्र, सकाळच्या दरम्यान भातकापणी आणि लगेचच झोडणीची कामे केली जात आहेत. भात कापणीबरोबर शेतात जावून शेतकरी वायंगणी शेतीचे काम करीत आहेत. ओझरखोल, परचुरी आदी भागांत ही शेती सुरू झाली आहे. शेतकरी वायंगणी शेतीतच गुंतला असल्याचे दिसत आहे. परचुरी, बावनदी, वांद्री तसेच डिंगणी खाडीपट्ट्यात वायंगणी शेती प्रामुख्याने केली जाते.
त्यामध्ये पावटा, हरभरा, मूग, कुळीथ यांसारखी पिके घेतली जातात. याच्या जोडीला मुळा, पावटा अशी भाजीही घेतली जाते. ग्रामीण भागात होणाऱ्या वायंगणी शेतीमधील भाजी व पिके जवळच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जातात. त्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे भातशेतीबरोबर वायंगणी शेतीला तेवढेच महत्त्व आहे. जमिनीतील तण काढून मशागत सुरू झाली आहे. अनेक भागांत महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतीचे मळे फुलवले जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:08 PM 22/Oct/2025














