Rajapur: दोनिवडेतील बीएसएनएलचा टॉवर सुरू करण्याची मागणी

राजापूर : तालुक्यातील दोनिवडे येथे भारत संचार निगमतर्फे (बीएसएनएल) एक वर्षांपूर्वी टॉवर उभारण्यात आला होता. मात्र तो कार्यान्वित झालेला नाही. हा टॉवर सुरू करा, अन्यथा आंदोलन करू अशी भूमिका दोनिवडे येथील सहयोग प्रतिष्ठानने घेतली आहे. संघटनेतर्फे भारत संचार निगमच्या रत्नागिरीतील व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे. तसेच ३१ ऑक्टोबरपर्यंत टॉवर चालू करा, अशी मागणी केली आहे.

संघटनेतर्फे खासदार नारायण राणे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदन देताना सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनंत गुरव, उपाध्यक्ष विष्णू शिरवडकर, सचिव अमोल करगुंटकर, प्रवीण तोरस्कर, अमित पडवळ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. दोनिवडे येथील टॉवरचे काम जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झालेले आहे. त्याला आज १ वर्ष पूर्ण झाले आह. तरीही बीएसएनएल कंपनीने टॉवर चालू केलेला नाही. याबाबत ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे ग्रामस्थामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हा टॉवर लवकरात लवकर चालू झाला नाही तर बीएसएनएल कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:56 22-10-2025