रत्नागिरी : आगामी रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष (भाजप) महायुतीने प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘दिवाळी शुभेच्छा अभियान’ आणि ‘नागरिक संवाद’ हा दुहेरी उपक्रम राबवला. भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या माध्यमातून नागरिकांशी थेट संपर्क साधत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासोबतच पक्षाची भूमिका आणि निवडणुकीची तयारी यावर भर देण्यात आला.
शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या विशेष उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, या भेटीदरम्यान पक्षाच्या विविध उपक्रमांची आणि विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आली.
या ‘नागरिक संवाद’ कार्यक्रमादरम्यान, निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रभाग क्रमांक १ चे शक्ती केंद्रप्रमुख नितीन जाधव, बुथ प्रमुख राकेश सुवारे, मंदार खंडकर, संदीप मांडवकर आणि निलेश मराठे यांच्यासह प्रभागातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या मुख्य समस्या, त्यांच्या अपेक्षा आणि निवडणूक व्यवस्थापन याबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला. नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या मतांची देवाणघेवाण करण्यात आली.
या अभियानात प्रणाली रायकर, सोनाली केसरकर, भक्ती दळी, प्रज्ञा टाकळे, कामना बेग, सारिका शर्मा, संतोष सावंत, प्रसाद बाष्ट्ये, नितीन गांगण, संदीप सुर्वे, निलेश आखाडे आणि संदीप रसाळ रायकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष दादा ढेकणे म्हणाले की, “मा. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील संघटनात्मक काम अधिक जोमाने सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, ‘नागरिक संवाद’ अभियानाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.”













