Ratnagiri : मजगाव येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका

रत्नागिरी : गुरुवार (दिनांक २३ ऑक्टोबर २०२५) रोजी रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे आंबा बागेतील एका विहिरीत पडलेल्या अंदाजे ६ ते ७ वर्षांच्या नर बिबट्याला वन विभागाने अत्यंत तत्परतेने व सुरक्षितरित्या बाहेर काढले.केवळ पंधरा मिनिटांत ही बचाव मोहीम (रेस्क्यू ऑपरेशन) यशस्वी झाली. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मजगाव येथील श्री. अमित अली अब्दुल हमीद काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या आयताकृती विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती गावचे पोलीस पाटील अशोक केळकर यांनी वनपाल, पाली यांना दूरध्वनीवरून दिली.

माहिती मिळताच, परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांनी तात्काळ विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी चिपळूण, श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक, श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम, पिंजरा व आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पाहणी केली असता, सुमारे २५ फूट खोल विहिरीत ७ ते ८ फूट पाणी होते आणि बिबट्या पाण्यात असलेल्या दगडावर बसलेला होता. विहीर कच्ची व आयताकृती (१५ फूट लांब, १० फूट रुंद) होती. भक्षाचा पाठलाग करताना विहिरीवर टाकलेल्या शेडनेटमुळे तोल जाऊन बिबट्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. वन कर्मचाऱ्यांनी प्रथम विहिरीच्या सभोवती जाळीचे नेट टाकून विहीर बंदिस्त केली. त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत सोडण्यात आला. बिबट्याने पिंजऱ्यात प्रवेश करताच, केवळ १५ मिनिटांच्या आत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

मालगुंड येथील पशुधन विकास अधिकारी श्री. स्वरूप काळे यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. या बचाव कार्यात श्री. प्रकाश सुतार (परिक्षेत्र वन अधिकारी), श्री. न्हानू गावडे (वनपाल), श्री. सारीक फकीर (वनपाल), श्री. विराज संसारे (वनरक्षक), शर्वरी कदम (वनरक्षक) यांच्यासह प्राणी मित्र आणि पोलीस अधिकारी तसेच सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि ग्रामस्थ यांनी मोलाचे सहकार्य केले.

बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरिजा देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 24-Oct-25