दापोली : गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे साखळोली (ता. दापोली) येथे चंद्रशेखर करमरकर यांच्या बंद घरावर वीज कोसळून घराला आग लागली. या आगीत घरातील इलेक्ट्रिक उपकरणे, बेड तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे.
आग लागल्याची घटना लक्षात येताच रामकृष्ण वसंत बर्वे, राजकुमार वसंत बर्वे, विशाल रामकृष्ण बर्वे, संदीप रामकृष्ण बर्वे, ओजस संदीप बर्वे, फोनवर माहिती मिळाल्यावर पोलीस पाटील सुनिल सोनू गौरत वाडीतील ग्रामस्थांना घेऊन आले, उपसरपंच दिनेश भागोजी जाधव, माजी उपसरपंच अनिल विश्राम शिंदे, संदीप चंद्रकांत गोरीवले, मंगेश गोरीवले, प्रमोद बुरटे व अन्य ग्रामस्थांच्या मदतीने तत्परतेने आग आटोक्यात आणली. त्यांच्या योग्य वेळी केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.
सुदैवाने, घर बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जवळील रामकृष्ण बर्वे आणि कुमार बर्वे यांच्या घरांमधील विद्युत उपकरणांचे तसेच इन्व्हर्टरचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील विनोद गोंधळेकर, विशाल गोंधळेकर, सागर बर्वे यांच्यासह समाज बांधव व ग्रामस्थ यांनी घटना स्थळी धाव घेतली.
या घटनेची माहिती कुमार बर्वे यांनी दिली असून, दरम्यान सायंकाळपासून परिसरात पावसाचा जोर कायम असून, या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतात पीक तयार झाले असून या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समजते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 24-Oct-25














