Mandangad : राहुल कोकाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मंडणगड तालुकाअध्यक्षपदी निवड

मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहुल कोकाटे यांची नुकतीच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंडणगड तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी नुकतेच राहुल कोकाटे यांना नियुक्ती पत्र देवून त्यांची पक्षाच्या मंडणगड तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

राहुल कोकाटे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. श्री. कोकाटे यांनी 2014 साली झालेल्या मंडणगड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने नगरसेवक म्हणून विजयी मिळवला होता. त्यांनतर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शहरातील अनेक महत्वपूर्ण विकासकामे हाती घेत पूर्णत्वास नेली आहेत.

आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरवात केलेले राहुल कोकाटे यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, उपनगराध्यक्ष, शहर अध्यक्ष ते आता तालुका अध्यक्ष असा वलयांकित राहिला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडणगड शहर, तालुका तसेच जिल्हा पातळीवर समर्थपणे काम करत पक्ष वाढविला आहे. दापोली मतदार संघातील तीनही तालुक्यात, जिल्ह्यात त्यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्यांच्या कामाचा धडाका पाहून पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर तालुका अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आल्याचे बोलले जाते.

आगामी काळात मतदार संघात पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारधारेवर, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने व वरिष्ठांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी व जनहितासाठी काम करणार. – तालुका अध्यक्ष राहुल कोकाटे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 24-Oct-25